नवी दिल्ली : निर्भयाचा मारेकरी विनय शर्मा हा मानसिक आजारी असून त्याच्या उपचारासाठी याचिकेद्वारे विनंती करण्यात आली होती. मात्र तिहार कारागृह प्रशासनाने दाखल केलेल्या पुराव्यांवरून विनय शर्माला कुठलाही मानसिक आजार नसल्याचे सिद्ध होते, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदविले आणि याचिका फेटाळून लावली.विनय शर्माच्या अर्जावरील पटियाला हाऊस न्यायालयात सुनावणी झाली. अलीकडेच विनय आपल्या आईसोबत दोनवेळा फोनवर बोलला. तरीही तो लोकांची ओळख विसरू लागला आहे, असा दावा त्याचे वकील कसा करू शकतात, असा सवाल तिहार प्रशासनाने उपस्थित केला होता. विनयने भिंतीवर डोके आपटल्यामुळे झालेली दुखापत वगळता त्याला कुठलाही त्रास नाही, असेही न्यायालयाला सांगण्यात आले. यावेळी कारागृहातील सीसीटीव्ही फुटेज न्यायालयात सादर करण्यात आले. आज सकाळी सुनावणी सुरू होताच तिहार प्रशासनाने विनयचे सर्व वैद्यकीय अहवाल सादर केले. त्याला जुना कुठलाही आजार नसल्याचेही स्पष्ट करण्यात आले. ‘विनय मानसिक आजारी असेल तर त्याने आपल्या वकिलांशी फोनवर बोलून सगळी माहिती कशी दिली असती,’ असा सवालही तिहार प्रशासनाची बाजू मांडताना अॅड. इरफान अहमद यांनी उपस्थित केला. १६ फेब्रुवारीला विनयने कारागृहात भिंतीवर डोके आपटून घेतल्यानंतर त्याच्यावर तातडीने उपचार करण्यात आले. यासंदर्भातील दोन्ही पुरावे न्यायालयात सादर करण्यात आले. त्यानंतर अतिरिक्त सत्र न्यायाधीश धर्मेंद्र राणा यांनी विनयची याचिका फेटाळून लावली. येत्या ३ मार्चला सकाळी ६ वाजता मारेकऱ्यांना तिहार कारागृहात फाशी देण्यात येईल.
निर्भयाच्या मारेकऱ्याची याचिका फेटाळली
By ऑनलाइन लोकमत | Published: February 23, 2020 2:52 AM