नवी दिल्ली : जम्मू-काश्मिरात दहशतवाद्यांविरुद्ध लढ्यात वीरमरण पत्करणारे राष्ट्रीय रायफलचे नायक नीरजकुमार सिंग यांना यंदाचा शौर्यासाठीचा सर्वोच्च सन्मान अशोक चक्र जाहीर झाला आहे. याशिवाय तिघांना कीर्तीचक्र आणि १२ जणांना शौर्यचक्र बहाल केले जाणार आहे.यात गेल्या डिसेंबर महिन्यात उरी येथील दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेले लेफ्टनंट कर्नल संकल्पकुमार यांचा समावेश आहे. ४८ जणांना सेना पदक, २ जणांना नौसेना पदक आणि ११ जणांना वायुसेना पदकाने सन्मानित केले जाणार आहे. विविध मोहिमांवर उल्लेखनीय कामगिरी बजावणाऱ्या २८ वीरांना परमविशिष्ट सेवा पदक, ३ जणांना उत्तम युद्ध सेवा पदक, ५३ अतिविशिष्ट सेवा पदक, १३ युद्ध सेवा पदक, ४२ सेना पदक, ८ नौसेना पदक, १९ वायुसेना पदक आणि १२४ जणांना विशिष्ट सेवा पदके बहाल केली जाणार आहेत. नायक नीरजकुमार यांनी जम्मू-काश्मीरच्या कूपवाडा जिल्ह्णात एका शोध मोहिमेदरम्यान शत्रूशी लढताना आपल्या प्राणांचे बलिदान दिले होते. तर मेजर वर्धराजन यांनी गेल्या वर्षी एप्रिल महिन्यात जम्मू काश्मीरच्या शोपिया जिल्ह्णात दहशतवाद्यांसोबत चकमकीत हिजबुल मुजाहिदिनच्या तीन दहशतवाद्यांना यमसदनी पाठविले होते. (लोकमत न्यूज नेटवर्क)
राष्ट्रीय रायफलचे नीरजकुमार यांना अशोकचक्र
By admin | Published: January 26, 2015 3:18 AM