नवी दिल्ली : देशाच्या आर्थिक स्थितीवरून अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्यावर सतत टीका होत असली तरी जगातील १00 पॉवरफुल (महत्त्वाच्या) महिलांच्या यादीत त्यांचा समावेश झाला आहे. फोर्ब्स मासिकाने जगातील १00 महत्त्वाच्या महिलांची जी यादी प्रसिद्ध केली आहे, त्यात निर्मला सीतारामन याही आहेत.
जगातील पाचव्या मोठ्या अर्थव्यवस्था असणाऱ्या भारताच्या अर्थ मंत्रालयाची जबाबदारी निर्मला सीतारामन यांच्याकडे असल्याने त्यांचा फोर्ब्सच्या यादीत समावेश झाला आहे. केंद्रात दुसऱ्यांदा मोदी सरकार आल्यानंतर निर्मला सीतारामन यांच्याकडे अर्थ मंत्रालयाची जबाबदारी सोपविण्यात आली. त्याआधी त्या मोदी सरकारमध्ये संरक्षणमंत्रीही होत्या. त्याआधी भारतामध्ये केवळ इंदिरा गांधी यांच्याकडेच काही काळ संरक्षण मंत्रालयाची जबाबदारी होती.
फोर्ब्सच्या यादीत त्या ३४ व्या क्रमांकावर आहेत. निर्मला सीतारामन यांनी दिल्लीच्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठातून अर्थशास्त्र विषयांमध्ये एमए व एम.फिल केले आहे. त्या २00६ पासून भारतीय जनता पक्षामध्ये आहेत. काही काळ त्या पक्षाच्या प्रवक्त्याही होत्या. फोर्ब्सने म्हटले आहे की, २0१९ मध्ये जगभरात सरकार, प्रशासन, उद्योग, व्यापार, माध्यमे व दानशूरता यांमध्ये महिलांचे मोठे योगदान असल्याचे आढळून आले आहे.
ग्रेटा थनबर्गही यादीत
फोर्ब्सच्या या १00 जणांच्या यादीमध्ये जर्मनीच्या चॅन्सलर अँजेला मर्केल अव्वल स्थानी आहेत. टाइम मासिकाने ‘पर्सन आॅफ द इयर’ म्हणून अलीकडेच जिचा गौरव केला, त्या सोळा वर्षे वयाच्या ग्रेटा थनबर्ग हिचेही नाव या यादीमध्ये आहे.ंू