नवी दिल्ली: आताच्या घडील देशातील पाच राज्यांच्या निवडणुकांची धूम सुरू आहे. यातच देशाचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग (Manmohan Singh) यांनी विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्यावर निशाणा साधला. पंजाब विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, भाजपने पंतप्रधान मोदींच्या सुरक्षेचा मुद्दा उपस्थित करून मुख्यमंत्री आणि पंजाबच्या जनतेचा अपमान केला आहे, अशी टीका मनमोहन सिंग यांनी केली. याला केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी प्रत्युत्तर दिले आहे. मनमोहन सिंग तुमचा मी खूप सन्मान करते. मात्र, तुमच्याकडून ही अपेक्षा नव्हती, असे निर्मला सीतारामन यांनी म्हटले आहे.
तुम्ही पाहिले तर तुमच्या लक्षात येईल की, श्रीमंत अधिक श्रीमंत होत आहेत. तर गरीब आणि गरीब होत चालला आहे. आजची परिस्थिती अत्यंत चिंताजनक आहे. कारण सरकारच्या धोरणांमुळे कोरोना काळात महागाई, बेरोजगारी वाढत आहे. मनमोहन सिंग म्हणाले, विद्यमान पंतप्रधान (नरेंद्र मोदी) आपल्या चुका सुधारण्याऐवजी देशाचे पहिले पंतप्रधान नेहरूंना दोषी ठरवत असतात, असे टीकास्त्र मनमोहन सिंग यांनी सोडले. मनमोहन सिंग यांनी पंजाबच्या जनतेसाठी एक व्हिडिओ संदेश जारी केला आहे. यामध्ये मोदी सरकारवर निशाणा साधला. याला आता निर्मला सीतारामन यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
मला तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती
निर्मला सीतारामन म्हणाल्या की, त्यांना (मनमोहन सिंग) भारताला सर्वांत कमकुवत बनवल्याबाबत आणि देशातील तीव्र महागाईवरून स्मरण केले जाते. मला तुमच्याबद्दल (मनमोहन) खूप आदर आहे. परंतु, मला तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती. यावेळी एनएसईच्या माजी प्रमुख चित्रा रामकृष्ण यांनी देशातील सर्वांत मोठे स्टॉक एक्स्चेंज चालवण्यासाठी हिमालयातील योगींचा सल्ला घेतल्याच्या अलीकडील खुलाशांचा निर्मला सीतारामन यांनी उल्लेख केला आणि मनमोहन सिंग यांना सत्तेत असताना या सर्व गोष्टींचा सुगावाही लागला नाही, असा टोला लगावला. सीतारामन यांनी मनमोहन सिंग आणि नरेंद्र मोदी यांच्या काळातील निर्यात आणि थेट विदेशी गुंतवणुकीची आकडेवारीच दिली.
दरम्यान, केंद्र सरकारने हेदेखील समजून घेतले पाहिजे की, चेहरा बदलल्याने स्थिती बदलत नाही, जे काही खरे आहे ते नेहमीच कोणत्या ना कोणत्या स्वरूपात बाहेर येतेच. मोठमोठ्या गोष्टी बोलणे सोपे असते पण त्या अंमलात आणणे खूप अवघड असते, असे परखड मत मनमोहन सिंग यांनी व्यक्त केले.