Nirmala Sitharaman : "राम मंदिराबाबत काँग्रेसने पसरवलं खोटं, १४ राज्यांत एकही जागा जिंकता आली नाही"
By ऑनलाइन लोकमत | Published: July 15, 2024 10:01 AM2024-07-15T10:01:25+5:302024-07-15T10:14:10+5:30
Nirmala Sitharaman And Congress : निर्मला सीतारामन यांनी रविवारी काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला आहे. तसेच काँग्रेसवर खोटेपणा पसरवल्याचा आणि भाजपाच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारविरोधात खोटी विधानं केल्याचा गंभीर आरोप केला.
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी रविवारी काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला आहे. तसेच काँग्रेसवर खोटेपणा पसरवल्याचा आणि भाजपाच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारविरोधात खोटी विधानं केल्याचा गंभीर आरोप केला. त्यांनी पक्ष कार्यकर्त्यांना तथ्य आणि आकडेवारीसह या खोट्याचा पर्दाफाश करण्यास सांगितलं आहे.
चंदिगड भाजपा प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीला संबोधित करताना सीतारामन यांनी ही माहिती दिली. त्यानंतर त्यांनी व्यापाऱ्यांची बैठक घेऊन त्यांच्या समस्या तसेच त्यांच्या मागण्या समजून घेतल्या. नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीचा संदर्भ देताना भाजपा नेत्याने सांगितलं की, "गेल्या दहा निवडणुकांमध्ये काँग्रेस २५० जागांचा टप्पा गाठण्यात अपयशी ठरली आहे. असं असूनही त्यांच्यामध्ये एक खोटा आत्मविश्वास आहे."
"१३ राजकीय पक्षांची इंडिया आघाडी केवळ २३२ जागा जिंकू शकली, तर भाजपाला स्वबळावर २४० जागा जिंकल्या. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत १४ राज्यांमध्ये काँग्रेसला एकही जागा जिंकता आली नाही" असं देखील अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटलं आहे.
काँग्रेसवर खोटं पसरवल्याचा आरोप
पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या विधानांचा विपर्यास आणि खोटेपणा पसरवल्याचा आरोप अर्थमंत्र्यांनी काँग्रेसवर केला. अयोध्येतील राम मंदिराच्या उभारणीसाठी संपादित केलेल्या जमिनीची भरपाई, अल्पकालीन लष्करी भरतीसाठी अग्निपथ योजना आणि इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन (ईव्हीएम) यासह अनेक मुद्द्यांवर विरोधी पक्षाने खोटे बोलण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप त्यांनी केला.
"काँग्रेसची रणनीती आपण गांभीर्याने समजून घेतली पाहिजे. खोटेपणा पसरवून आणि खोटी विधानं करून भाजपावर हल्लाबोल करण्याचा प्रयत्न केला जात आहे. तसेच विरोधी पक्षाने पसरवलेल्या प्रत्येक खोट्या विधानाला सोशल मीडियावर लगेचच तथ्य आणि आकडेवारीसह उत्तर दिले पाहिजे" असंही सीतारामन यांनी सांगितलं आहे.