नवी दिल्ली : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी (Nirmala Sitharaman) आज राज्यसभेत सर्वसाधारण अर्थसंकल्पावरील चर्चेदरम्यान अनेक प्रश्नांना उत्तरे दिली. यावेळी एक खासदाराद्वारे अर्थसंकल्प अमृतकाळ नसून राहूकाळ आहे, असा टोला लगावला होता. त्यावर उत्तर देत अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी काँग्रेसवर हल्लाबोल केला.
आमचा अमृतकाळ हा तुमचा राहूकाळ आहे, असे अर्थमंत्री निर्मला सीतारामन म्हणाल्या. तसेच, यूपीएच्या काळात झालेल्या अनेक मोठ्या घोटाळ्यांसाठी त्यांनी विरोधकांवर निशाणा साधला आणि पंतप्रधान मोदी सरकारने आणलेल्या अनेक योजनांबाबत सविस्तर उत्तरे दिली.
यूपीए सरकारच्या काळात मोठ्या घोटाळ्यांचा संदर्भ देत अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी देशासाठी तेव्हाचा राहूकाळ असल्याचे सांगितले. राहूकाळ तेव्हा होता, जेव्हा एक पंतप्रधान अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांना भेटणार होते आणि त्यांनी जे मंजूर केलेले विधेयक होते, ते मीडियासमोर फाडण्यात आले, असे अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितले.
राहूकाळ म्हणजे, जे G-23 म्हणतात. आमचा अमृतकाळ हा त्यांचा राहूकाळ आहे. पक्षाचे वरिष्ठ नेते पक्ष सोडून बाहेर पडत आहेत, हा राहूकाळ आहे. राहूकाळाचा सामना करणार्या काँग्रेस पक्षाला 44 जागा मिळाल्या आहेत आणि त्यातून बाहेर पडता येत नाही, यात काही आश्चर्य नाही, असे अर्थमंत्री निर्मला सीतारामन म्हणाल्या.
याचबरोबर, ज्या राज्यात काँग्रेसची सत्ता आहे, तिथे राहूकाळ आहे. जिथे ते म्हणतात, "मी मुलगी आहे, लढू शकते"... पण राजस्थानमध्ये मुली लढू शकत नाहीत. तिथे रोज काही ना काही घोटाळा होत आहे, असे म्हणत अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी काँग्रेसवर हल्लाबोल केला.