नवी दिल्ली: आरबीआयचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी सरकारच्या आर्थिक धोरणांवर टीका करत नोटबंदी आणि जीएसटीच्या निर्णयामुळे देशाची अर्थव्यवस्था वाईट झाली असल्याचे सांगत सरकारवर निशाणा साधला होता. मात्र माजी पंतप्रधान मनमोहन सिंग आणि आरबीआयचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांच्या कार्यकाळातच देशातील सार्वजनिक क्षेत्रातील बँकांची स्थिती आज वाईट असल्याचे वक्तव्य अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केलं आहे. कोलंबिया विद्यापीठाच्या 'स्कूल ऑफ इंटरनॅशनल एँड पब्लिक एफेअर्स'च्या कार्यक्रमात त्या बोलत होत्या.
निर्मला सीतारामन म्हणाल्या की, आरबीआयचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांचा मी नेहमीच आदर करते. भारताचा विकासदर जेव्हा उंचावर होता. त्यावेळी रघुराम राजन यांनी देशातील मध्यवर्ती बँकेचे नेतृत्त्व केले होते. मात्र रघुराम राजन यांच्या कार्यकाळात राजकीय नेत्यांच्या एका फोनवर काही लोकांना कर्ज देण्यात आले. या कारणांमुळेच बँकांना आज शिक्षेचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे झालेल्या नुकासानातून बाहेर पडण्यासाठी सार्वजनिक क्षेत्रातील बँका सरकारी मदत निधीवर अवलंबून असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. तसेच माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्याकडे देशाच्या अर्थव्यवस्थेबद्दल व्हिजन होती. परंतु तरीही बँकांची स्थिती वाईट झाल्याचे निर्मला सीतारामन यांनी स्पष्ट केले.
अर्थमंत्री निर्मला सीतारामन अर्थव्यवस्थेबाबत त्यांच्या पतीने दिलेला सल्ला ऐकणार का?: शरद पवार
भारतीय रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. भारताची अर्थव्यवस्था एक व्यक्ती स्वतःच्या मर्जीप्रमाणे चालवू शकत नाही. भारतीय अर्थव्यवस्था आता खूप मोठी झाली आहे. एका व्यक्तीच्या माध्यमातून चालवण्यात येणाऱ्या अर्थव्यवस्थेचं उदाहरण आपण पाहतोच आहोत, अशी टीकाही रघुराम राजन यांनी मोदी सरकारवर केली होती. तसेच सुस्तावलेल्या आर्थिक परिस्थितीला नोटाबंदी आणि जीएसटी जबाबदार आहे. जर हे दोन्ही निर्णय जनता आणि अर्थव्यवस्थेवर लादले नसते तर अर्थव्यवस्थेनं चांगलं प्रदर्शन केलं असतं. सरकारनं कोणाचाही सल्ला न घेता नोटाबंदीचा निर्णय लागू केला आहे. नोटाबंदीनं जनतेचं नुकसानच झालं असून, त्यानं काहीही निष्पन्न झालं नसल्याचे रघुराम राजन यांनी सांगितले होते.