नवी दिल्ली: देशात सर्वत्र सुधारित नागरिकत्व विधेयकावरुन सर्वत्र आंदोलन सुरु असतानाच आता याच मुद्यावरून राजकीय पडसाद उमटताना पाहायला मिळत आहे. काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांनी या कायद्याविरोधातील आंदोलनामुळे देशात निर्माण झालेल्या परिस्थितीवरून केंद्रातील सत्ताधारी भाजपावर जोरदार टीका केली होती. त्यांच्या या टीकेला आता केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी प्रतिउत्तर दिले आहे. सोनिया गांधी ह्या देशातील नागरिकांची नागरिकत्व विधेयकावरुन दिशाभूल करत असल्याचा आरोप सीतारमण यांनी केला आहे.
नागरिकत्व विधेयकावरुन सत्ताधारी व विरोधी पक्षात आरोप-प्रत्यारोप सुरु झाले आहेत. तर जनतेला सरकारच्या चुकीच्या धोरणांविरोधात आवाज उठवण्याचा अधिकार आहे. मात्र सरकार त्यांच्या म्हणण्याकडे दुर्लक्ष करून त्यांचा आवाज क्रूरपणे दाबत असल्याचा आरोप सोनिया गांधी यांनी व्हिडीओ संदेशातून शुक्रवारी केला होता. तर सोनिया गांधी यांनी केलेल्या आरोपाला भाजपकडून उत्तर देण्यात आले आहे.
सोनिया गांधी यांच्यावर आरोप करताना अर्थमंत्री निर्मला सीतारमण म्हणाल्या की, सोनिया गांधी ह्या चुकीच्या पद्धतीने CAA ची तुलना NRC सोबत करीत असून, ज्याचा मसुदा अद्याप तयार झाला नाही. तर सोनिया गांधी ह्या देशातील नागरिकांची नागरिकत्व विधेयकावरुन दिशाभूल करत असल्याचा आरोप सुद्धा सीतारमण यांनी केला आहे.
देशातील नागरिकांनी हिंसाचार आणि भीती पसरवणाऱ्या लोकांपासून सावध राहिले पाहिजे. देशातील जनतेला कोणत्याही भीतीखाली राहू नयेत. तर काँग्रेस, तृणमूल आणि आम आदमी पार्टी तसेच डावे पक्ष सुधारित नागरिकत्व कायद्याला एनआरसीशी जोडत आहे. प्रत्यक्षात मात्र एनआरसीचा मसुदा अद्यापही तयार करण्यात आला नसल्याचे सुद्धा सीतारमण म्हणाल्या.
तसेच देशातील जनतेने निराश झालेल्या काँग्रेस, टीएमसी, आप आणि डाव्या पक्षातील नेत्यांच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नयेत. तर नागरिकत्व दुरुस्ती कायद्यात कोणत्याही भारतीयांचे नागरिकत्व काढून घेणार नाही. या कायद्याचा कोणत्याही भारतीय नागरिकाशी काही संबंध नसल्याचे सुद्धा सीतारमण म्हणाल्या.