शशी थरुरांच्या भेटीला निर्मला सितारमण; ट्विटरवरुन मानले आभार
By ऑनलाइन लोकमत | Published: April 16, 2019 11:13 AM2019-04-16T11:13:06+5:302019-04-16T11:14:58+5:30
मंगळवारी संरक्षणमंत्री आणि भाजपा नेत्या निर्मला सितारमण यांनी शशी थरुर यांची भेट घेतली आणि त्यांच्या तब्येतीची चौकशी केली.
नवी दिल्ली : केरळातील तिरुवअनंतपुरम येथे एका मंदिरात पूजा करताना काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि खासदार शशी थरुर यांचा काल अपघात झाला. यात त्यांच्या डोक्याला मार लागला असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. आज, मंगळवारी संरक्षणमंत्री आणि भाजपा नेत्या निर्मला सितारमण यांनी शशी थरुर यांची भेट घेतली आणि त्यांच्या तब्येतीची चौकशी केली.
निर्मला सितारमण यांनी भेट घेतल्याची माहिती शशी थरुर यांनी आपल्या ट्विटर पेजवरुन दिली आहे. केरळमधील निवडणुकीच्या प्रचारात व्यस्त असताना सुद्धा आज सकाळी निर्मला सितारमण यांनी रुग्णालयात येऊन माझी भेट घेतली. त्यांच्या या स्वभावाबद्दल मला मनापासून बरे वाटले. भारतीय राजकारणातील सभ्यता एक दुर्मीळ गुण आहे. हेच त्यांच्याकडून होताना दिसून आले, असे शशी थरुर यांनी म्हटले आहे.
Touched by the gesture of @nsitharaman, who dropped by today morning to visit me in the hospital, amid her hectic electioneering in Kerala. Civility is a rare virtue in Indian politics - great to see her practice it by example! pic.twitter.com/XqbLf1iCR5
— Shashi Tharoor (@ShashiTharoor) April 16, 2019
दरम्यान, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि खासदार शशी थरुर यांना केरळमध्ये काल अपघात झाला आहे. तिरुवअनंतपुरम असलेल्या थंपानूर येथील गंधारी अमन कोवित मंदिरात शशी थरुर यांची तुला करण्यात येत होती. त्यावेळी शशी थरुर हे एका तराजूत बसले होते, तर दुसऱ्या तराजूत काही साहित्य ठेवण्यात येत होते. त्यावेळी दुसऱ्या तराजुतील साहित्य कमी-अधिक झाल्याने शशी थरुर यांचा तोल गेला. त्यात त्यांचा अपघात होऊन त्यांच्या डोक्याला इजा झाली. त्यामध्ये त्यांच्या डोक्याला 6 टाके पडले आहेत. सुदैवाने, गंभीर दुखापत टळली असून त्यांची प्रकृती ठीक असल्याचे डॉक्टरांनी म्हटले आहे.