नवी दिल्ली : नोटाबंदी आणि वस्तू आणि सेवाकर (जीएसटी) हे दोन सुरुंग पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाच्या अर्थव्यवस्थेला लावले, असा आरोप काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी सोमवारी केला. पक्षाच्या येथील मुख्यालयाबाहेर वार्ताहरांशी बोलताना गांधी म्हणाले की, नोटाबंदीच्या सुरुंगाचा फटका सोसण्यास अर्थव्यवस्था सक्षम होती; परंतु जीएसटीच्या दुसºया सुरुंगाला ती सहन करू शकली नाही, आता तिच्या चिंध्या झाल्या आहेत.नोटाबंदी आणि जीएसटीमुळे लोकांना किती त्रास आणि दु:ख झाले आहे हे मोदी समजून घेऊ शकत नाहीत, असे ते म्हणाले. तत्पूर्वी, राहुल गांधी यांनी पक्षाचे सरचिटणीस आणि राज्यांचे प्रभारी यांची बैठक घेतली. या बैठकीत नोटाबंदीच्या निर्णयाला एक वर्ष झाल्याच्या दिवशी कोणते कार्यक्रम राबवायचे, यावर चर्चा झाली.जीएसटीच्या मुद्यावर माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या उपस्थितीत स्वतंत्र बैठक झाली.नोटाबंदीचा निर्णय हा मोठा फटका होता, असे सांगून राहुल गांधी म्हणाले की, संपूर्ण देशासाठी ८ नोव्हेंबर हा ‘दु:खाचा दिवस’ आहे. ते जरी ८ नोव्हेंबर साजरा करणार असले तरी सामान्य माणसाला त्या निर्णयामुळे जो त्रास झाला तो त्यांनी समजून घ्यायची गरज आहे. नोटाबंदी हा एक सुरुंगच होता. ८ नोव्हेंबर हा दिवस काँग्रेस आणि इतर विरोधी पक्ष ‘काळा दिन’ म्हणून पाळणार आहेत.
नोटाबंदी, जीएसटी हे मोदींनी लावलेले सुरुंग; ८ नोव्हेंबरच्या ‘काळ्या दिना’वर चर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 31, 2017 12:12 AM