"माझ्या धार्मिक भावना दुखावल्या...", तडकाफडकी राजीनाम्यानंतर उपजिल्हाधिकाऱ्यांनी दिलं स्पष्टीकरण
By ऑनलाइन लोकमत | Published: June 23, 2023 07:05 PM2023-06-23T19:05:14+5:302023-06-23T19:05:48+5:30
nisha bangre news : उपजिल्हाधिकारी निशा बांगरे यांनी दिलेल्या राजीनाम्याची सर्वत्र चर्चा रंगली आहे.
मध्य प्रदेशातील छतरपूर येथील उपजिल्हाधिकारी निशा बांगरे यांनी दिलेल्या राजीनाम्याची सर्वत्र चर्चा रंगली आहे. खरं तर सुट्टी न मिळाल्याने संतप्त उपजिल्हाधिकाऱ्यांनी तडकाफडकी राजीनामा दिला. निशा बांगरे यांनी आपला राजीनामा २२ जून रोजी प्रधान सचिव, सामान्य प्रशासन विभाग यांच्याकडे पाठवला. त्यांना आंतरराष्ट्रीय सर्वधर्म शांती परिषद आणि जागतिक शांतता पुरस्कार समारंभ तसेच २५ जून रोजी त्यांच्या घराच्या गृहप्रवेशासाठी जायचे होते. पण सरकारने परवानगी नाकारली अन् त्यांनी थेट राजीनामा दिला.
निशा बांगरे यांनी दिलं स्पष्टीकरण
तडकाफडी दिलेल्या राजीनाम्यामुळे प्रसिद्धीच्या झोतात आलेल्या बांगरे यांनी याबद्दल स्पष्टीकरण दिले आहे. "२५ जूनला मला माझ्या घराच्या गृहप्रवेशासाठी जायचे आहे, तिथे आमचे काही पाहुणे येणार आहेत. सर्वधर्म शांतता परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. ज्याला उपस्थित राहण्यासाठी प्रशासनाची परवानगी मागितली होती. मी दोनदा परवानगी मागितली होती पण परवानगी मिळाली नाही. परवानगी न दिल्याने माझ्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्या आणि माझ्या मूलभूत अधिकारांचे उल्लंघन झाले, त्यानंतर मला असे वाटले की मला माझे मूलभूत अधिकार मिळत नसताना त्या खुर्चीवर बसण्याचा अधिकार नाही", असे निशा बांगरे यांनी सांगितले.
25 जून को मेरे घर का उद्घाटन है जिसमें हमारे मेहमान आने वाल हैं। इसमें सर्वधर्म शांति सम्मेलन रखा गया था जिसमें उपस्थित रहने के लिए प्रशासन से अनुमति मांगी थी। मैंने दो बार अनुमति मांगी थी लेकिन अनुमति स्वीकृत नहीं हुई। अनुमती स्वीकृत न होने से मेरी धार्मिक भावनाएं आहत हुई और… pic.twitter.com/bo3T3iRZnh
— ANI_HindiNews (@AHindinews) June 23, 2023
दरम्यान, २५ जून रोजी मध्य प्रदेशातील बैतूल येथील आमला इथे आंतरराष्ट्रीय सर्वधर्म शांती परिषद आणि जागतिक शांतता पुरस्काराचे आयोजन करण्यात आले आहे. गगन मलिक फाऊंडेशनच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याचे समजते. या कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी आणि त्यांच्या घराच्या गृहप्रवेशाच्या कार्यक्रमासाठी उपजिल्हाधिकारी निशा बांगरे यांनी रजा मागितली होती. श्रीलंकेच्या कायदा मंत्र्यांसह ११ देशांतील सर्व धर्मांचे प्रतिनिधी शांतता पुरस्कार सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. यामध्ये तथागत बुद्धांच्या अस्थीही श्रीलंकेतून आणण्यात येणार आहेत. पण, या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी सुट्टी न मिळाल्याने उपजिल्हाधिकारी निशा बांगरे यांनी आपल्या पदाचा तडकाफडकी राजीनामा दिला.
पत्राद्वारे दिला राजीनामा
निशा बांगरे यांनी रजा न मिळाल्याने संतप्त होत सरकारला पत्र लिहले. "वरील विषयांतर्गत मला कळवायचे आहे की, मला माझ्या घराच्या गृहप्रवेशाच्या कार्यक्रमासाठी जाण्यासाठी सुट्टी न मिळाल्याने मला दुःख झाले आहे. तसेच जागतिक शांततेचे दूत तथागत बुद्ध यांच्या अस्थिकलशाचे दर्शन मला घेऊ न दिल्यामुळे माझ्या धार्मिक भावनांना कधीही भरून न येणारी हानी पोहोचली आहे. त्यामुळे माझे मुलभूत हक्क, धार्मिक श्रद्धा आणि घटनात्मक मूल्यांशी तडजोड करून उपजिल्हाधिकारी पदावर राहणे मला योग्य वाटत नाही. म्हणूनच मी आज २२-६-२०२३ रोजी तात्काळ उपजिल्हाधिकारी पदाचा राजीनामा देत आहे", असे त्यांनी पत्रात नमूद केले आहे.