Tejashwi Yadav Nitesh Rane Controversy : भाजप आमदार नितेश राणे यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त विधान केल्याने नव्या वादाला तोंड फुटले आहे. नितेश राणे यांनी मुस्लीम समाजाबद्दल केलेल्या विधानानंतर विरोधकांनी पंतप्रधान मोदी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सवाल केले आहेत.
नितेश राणे यांनी अहमदनगर शहरात झालेल्या कार्यक्रमात मुस्लीम समाजाबद्दल धमकी देणारे विधान केले. या प्रकरणी त्यांच्याविरोधात अहमदनगर शहरातील तोफखाना पोलीस ठाण्यात आणि श्रीरामपूर पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.
विरोधकांकडून भाजपवर टीकास्त्र
नितेश राणे यांच्या वादग्रस्त विधानाने विरोधकांना आयता मुद्दा मिळाला असून, भाजप टीकेचे धनी होताना दिसत आहे. काँग्रेस, शिवसेना उबाठा, शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षाच्या नेत्यांकडून भाजपवर टीका करण्यात आली.
विजय वडेट्टीवार काय म्हणाले?
"मुख्यमंत्री साहेब हे दंगलखोर कोण आहे? तुम्ही म्हणता विरोधकांना महाराष्ट्र अशांत ठेवायचा आहे, मगहे आमदार कोण आहेत? कोणत्या पक्षाचे आहेत? कोणाला घुसून मारण्याची भाषा करत आहे? राज्याचा गृह विभाग कुठे आहे? गृहमंत्री गप्प का? कोणती कारवाई का नाही?", असा सवाल वडेट्टीवारांनी फडणवीसांना केला.
"तुम्ही कारवाई करणार नाही, करूच शकत नाही. कारण अशा दंगलखोरांना-गुंडांना सोबत घेऊन तुम्हाला दंगल घडवायची आहे... सत्तेसाठी तुम्ही महाराष्ट्र जाळायला निघाले आहात. हे पाप तुमचे आहे. कारवाई करा, तुम्हाला महाराष्ट्राचे भल व्हावं असे वाटत असेल तर या चिथावणीखोर आमदारावर कारवाई करा", अशी मागणी वडेट्टीवार यांनी केली आहे.
मोदीजी, नितेश राणेंना पुन्हा तिकीट देणार का?
आमदार नितेश राणे यांचा व्हिडीओ पोस्ट करत राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव यांनी थेट मोदींनाच सवाल केले आहेत.
तेजस्वी यादव यांनी म्हटले आहे की, "देशवासियांसाठी विष ओकणारा हा व्यक्ती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रिय वरिष्ठ सहकारी खासदार नारायण राणे यांचा मुलगा भाजप आमदार आहे."
"हा भाजप आमदार संविधान आणि कायद्याची बाजूला करून मशिदीमध्ये घुसून मारण्याची धमकी देत आहे. आखाती देशात जाऊ पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रार्थना करतात. मशिदीमध्ये फिरतात. परदेशात गांधी आणि बुद्धाचे विचार सांगतात आणि मायदेशात हिंसा करणे, भाजप शासित राज्यांत कापण्याची, मारण्याची धमकी देणाऱ्या आपल्या लोकांना आश्रय देतात", अशी टीका तेजस्वी यादव यांनी केली आहे.
तेजस्वी यादव पुढे म्हणतात, "पंतप्रधानांची ही दुटप्पी भूमिका नाही का? पंतप्रधान त्याला मनापासून माफ करणार की, पुन्हा भाजपचे तिकीट देऊन त्याला पाठिंबा देणार?"
"भाजप एकीकडे संघटना आणि लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून द्वेष पसरवून मुस्लिमांना लक्ष्य करत आहे. दुसरीकडे भाजप, आरएसएस आपल्या सलग्नि एजंटामार्फत भ्रम पसरवून फूट पाडण्याचे काम करत आहे. भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकार संविधान, समानता आणि सौहार्दसाठी अतिशय धोकादायक आहे", अशी टीका तेजस्वी यादव यांनी केली आहे.