Hyperloop Train: भारतीय रेल्वेवर आताच्या घडीला अनेक नाविन्यपूर्ण आणि महत्त्वाचे प्रकल्प सुरू आहेत. यातील काही प्रकल्पांचे लोकार्पण होणार असून, आगामी काही वर्षांत भारतीय रेल्वे अनेक प्रकल्प सुरू करण्याच्या तयारीत आहे. सध्या देशभरात सर्वांत वेगवान ट्रेन असण्याचा मान वंदे भारत एक्स्प्रेसला आहे. बुलेट ट्रेनचे काम सुरू असून, काही वर्षांत प्रत्यक्ष परिचालन सुरू होऊ शकते, असे म्हटले जात आहे. मात्र, यातच आता प्रचंड वेग असलेली आणि मुंबई-पुणेसारखे अंतर केवळ २० मिनिटांत जाऊ शकणारी हायपरलूप ट्रेन देशात कधीपर्यंत सुरू होऊ शकेल, याबाबत नीति आयोगाने अतिशय महत्त्वाची माहिती दिली आहे.
व्हर्जिन हायपरलूप ट्रेनची चाचणी ९ नोव्हेंबर २०२० रोजी अमेरिकेत घेण्यात आली होती. ही चाचणी ५०० मीटरच्या ट्रॅकवर पॉडसह घेण्यात आली. त्यात एक भारतीय आणि इतर प्रवासी होते. त्याचा वेग ताशी १६१ किलोमीटरहून अधिक होता. अशी ट्रेन भारतात आणण्यासंदर्भात चाचपणी सुरू होती. याबाबत नीति आयोगाचे सदस्य व्ही. के. सारस्वत यांनी माहिती दिली. निकटच्या वर्षांत तरी हायपरलूप ट्रेन भारतात चालवणे शक्य नाही. देशात आताच्या घडीला हायपरलूप ट्रेन आणण्यासाठी तंत्रज्ञान तेवढे परिपक्व नाही. तंत्रज्ञानाचा स्तर त्या तुलनेने खूपच कमी आहे. तसेच आर्थिक दृष्टिकोनातून विचार केल्यास हा प्रकल्प सध्यातरी व्यवहार्य नाही, असे सारस्वत यांनी सांगितले.
काही विदेशी कंपन्यांनी भारतात हायपरलूपचे तंत्रज्ञान आणण्यात रस दाखविला
व्हर्जिन हायपरलूप तंत्रज्ञान आणि त्याची व्यावसायिक व्यवहार्यता तपासण्यासाठी एका समितीची स्थापना करण्यात आली होती. या समितीचे सारस्वत अध्यक्ष आहेत. काही विदेशी कंपन्यांनी भारतात हायपरलूपचे तंत्रज्ञान आणण्यात रस दाखविला आहे. आपल्या देशात हायपरलूपसाठी परदेशातून जे प्रस्ताव आले, ते जास्त व्यवहार्य पर्याय नाहीत. हे तंत्रज्ञान अजूनही खूपच प्राथमिक अवस्थेत आहे. आम्ही आजच्या स्थितीत याला जास्त महत्त्व देत नाही. या तंत्रज्ञानाला केवळ स्टडी प्रोग्राम पातळीवर पाहिले जात आहे. निकटच्या भविष्यात हायपरलूप तंत्रज्ञान आपल्या परिवहन व्यवस्थेचा भाग होऊ शकते, असा विश्वास सारस्वत यांनी व्यक्त केला.
दरम्यान, आम्ही अशा प्रकारच्या तंत्रज्ञानात गुंतवणूक करू शकत नाही. व्हर्जिन हायपरलूप ही काही मूठभर कंपन्यांपैकी एक आहे, जी प्रवासी वाहतुकीसाठी अशी प्रणाली तयार करण्याचा प्रयत्न करीत आहे, असेही ते म्हणाले. हायपरलूप एक हायस्पीड ट्रेन असून, ही ट्रेन ट्यूबच्या पोकळीत चालवली जाते. इलेक्ट्रिक कार कंपनी टेस्ला आणि अंतराळ प्रवास कंपनी स्पेसएक्सची मालकी असलेल्या अब्जाधीश इलॉन मस्क यांचे हे प्रस्तावित तंत्रज्ञान आहे.