नवी दिल्लीः पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखाली आज नीती आयोगाची बैठक झाली. नीती आयोगाच्या पाचव्या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भारताच्या अर्थव्यवस्थेला 2024पर्यंत 5 ट्रिलियन डॉलरपर्यंत पोहोचवण्याचं लक्ष्य ठरवलं आहे. मोदी म्हणाले, हे आव्हानात्मक आहे. परंतु त्या लक्ष्यापर्यंत पोहोचू शकतो. सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास हे मंत्र पूर्ण करण्यात नीती आयोगाची महत्त्वाची भूमिका आहे. उत्पन्न आणि रोजगार वाढवण्यासाठी निर्यात क्षेत्रालाही चालना देण्याची गरज आहे.नीती आयोगाच्या बैठकीला संबोधित करताना मोदी म्हणाले, 2024पर्यंत देशाची अर्थव्यवस्था 5 ट्रिलियन डॉलर म्हणजेच 34,94,00,00 कोटी रुपये करण्याचं लक्ष्य ठेवलं आहे. हे लक्ष्य आव्हानात्मक आहे, परंतु राज्य सरकारांच्या मेहनतीनं ते गाठू शकतो, राज्यांनी आपापली आर्थिक क्षमता ओळखली पाहिजे. जीडीपीचा टार्गेट वाढवण्यावर भर दिला पाहिजे. त्यासाठी जिल्हा स्तरावर काम करण्याची गरज आहे. देश कामगिरी, पारदर्शकता आणि वितरण प्रणालीच्या मार्गावर चालला आहे. त्यामुळेच योजना गरिबांपर्यंत पोहोचण्याची गरज आहे. गव्हर्निंग काऊंसिलनंही एका अशा सरकारी व्यवस्थेचं निर्माण करावं, त्याच्यावर लोकांचा विश्वास बसेल, असंही मोदी म्हणाले आहेत. यावेळी मोदींनी पाण्याचं महत्त्वही अधोरेखित केलं आहे.
नीती आयोगाच्या बैठकीत ठरला न्यू इंडियाचा रोडमॅप, 5 ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेचं लक्ष्य
By ऑनलाइन लोकमत | Published: June 15, 2019 6:11 PM