नवी दिल्ली : देशाची राजधानी दिल्लीतीलप्रदूषण गेल्या काही दिवसांपासून अत्यंत धोकादायक पातळीवर आहे. दिल्लीत प्रदूषणाची पातळी सातत्याने वाढत आहे. या वाढत्या प्रदूषणाचा परिणाम सर्वांवर होताना दिसत आहे. दरम्यान, या प्रदूषणामुळेच राजधानी दिल्लीत यावेसे वाटत नाही, असे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटले आहे.
केंद्रीय मंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते नितीन गडकरी यांनी मंगळवारी एका कार्यक्रमाला संबोधित केले. यावेळी, राजधानी दिल्ली हे असे शहर आहे, जिथे मला राहायला आवडत नाही. येथील प्रदूषणामुळे मला संसर्ग होतो, असे नितीन गडकरी म्हणाले. तसेच, पुढे ते म्हणाले, "मी प्रत्येक वेळी दिल्लीत येतो, तेव्हा मला असे वाटते की मी येथे येऊ नये, कारण येथे इतके भयंकर प्रदूषण आहे."
याचबरोबर, दिवसेंदिवस वाढणारी प्रदूषणाची पातळी कमी करण्याच्या सूचना नितीन गडकरी यांनी दिल्या आहेत. ते म्हणाले की, प्रदूषण कमी करण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे जीवाश्म इंधनाचा वापर कमी करणे. असे झाल्यास प्रदूषणाच्या पातळीत लक्षणीय घट होऊ शकते. भारत २२ लाख कोटी रुपयांचे जीवाश्म इंधन आयात करतो, जे अर्थव्यवस्था, पर्यावरण आणि पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून आव्हानात्मक आहे. पर्यायी इंधनांना प्रोत्साहन देऊन आपण जीवाश्म इंधनाची आयात कमी करू शकतो, असे नितीन गडकरी यांनी सांगितले.
बेरोजगारी ही भारताची प्रमुख समस्या - गडकरीदरम्यान, केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी आपल्या स्पष्टवक्ते स्वभावासाठी ओळखले जातात. त्यामुळे गडकरी अनेकदा चर्चेतही असतात. या कार्यक्रमादरम्यान ते म्हणाले की, भारतासमोरील सर्वात मोठी समस्या म्हणजे गरिबी, उपासमार आणि बेरोजगारी आहे, त्यामुळे आगामी काळात आर्थिक आणि सामाजिक समता साधण्याची काळजी सरकारला घ्यावी लागणार आहे.
राजधानी दिल्लीत प्रदूषणाचा परिणामराजधानी दिल्लीत रहिवाशांना मंगळवारी हवेच्या गुणवत्तेत किंचित सुधारणा दिसून आली. दिल्लीतील अनेक भागात सरासरी हवा गुणवत्ता निर्देशांक (AQI) सकाळी २७४ वर राहिला, जो सलग तिसऱ्या दिवशी दिलासा देणारा आहे. नोव्हेंबरच्या तुलनेत या महिन्याच्या सुरुवातीला (डिसेंबर) राजधानी दिल्ली आणि आसपास राहणाऱ्या लोकांसाठी श्वास घेणे तुलनेने सोपे झाले आहे. मात्र, सध्या प्रदूषण गंभीर अवस्थेत आहे.