नवी दिल्ली : केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांना पुन्हा जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. यावेळेस त्यांच्या दिल्लीतील कार्यालयात फोन करुन ही धमकी देण्यात आली. या धमकीच्या कॉलनंतर खळबळ उडाली असून, तत्काळ दिल्ली पोलिसांना याची माहिती देण्यात आली आहे.
सध्या पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी नितीन गडकरी यांच्या दिल्लीतील निवासस्थानी त्यांना जीवे मारण्याची धमकी देणारा फोन आला होता, त्यानंतर मंगळवारी दिल्ली पोलिसांना याची माहिती देण्यात आली. या प्रकरणाची गंभीर दखल घेत पोलिसांनी तपास सुरू केला असून आरोपींना पकडण्याचा प्रयत्न सुरू आहे.
यापूर्वी धमकीचे फोन आले होतेनितीन गडकरींना जीवे मारण्याची धमकी मिळण्याची ही पहिलीच वेळ नाही. त्यांना जीवे मारण्याची धमकी मिळण्याची या वर्षातील ही दुसरी घटना आहे. यापूर्वी नितीन गडकरींच्या नागपूरमधील कार्यालयात जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. जानेवारी महिन्यात त्यांच्या निवासस्थानी आणि कार्यालयात फोन आले होते. तेव्हा नागपूर पोलिसांनी सांगितले होते की, कर्नाटकातील बेळगाव येथील तुरुंगातून हा धमकीचा फोन आला आहे. फोन करणारा जयेश कंठा हा कुख्यात गुंड आणि खुनाचा आरोपी असून तो बेळगावी कारागृहात बंद आहे.