नवी दिल्ली : गुणा लोकसभा मतदारसंघात महामार्गाची कोनशिला व निमंत्रण पत्रिकेतून स्थानिक खासदार ज्योतिरादित्य शिंदे यांचे नाव मध्य प्रदेश सरकारने वगळल्याबद्दल केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी गुरुवारी लोकसभेत दिलगिरी व्यक्त केली.सभागृहात ज्योतिरादित्य शिंदे म्हणाले की, या उद््घाटनाला राज्य सरकारने मला बोलावले नाही. शिवाय कोनशिलेतून माझे नावही काढून टाकले. राजशिष्टाचाराचे पालन न झाल्याने आपण हक्कभंंगाचा ठराव आणू इच्छित आहोत.त्यावर गडकरी म्हणाले की, याची मला पूर्ण कल्पना आहे. हे प्रकार टाळायला हवेत. समारंभाला मी उपस्थित असल्याने यालाही मीच जबाबदार आहे. कोनशिला व निमंत्रण पत्रिकेवर स्थानिक खासदाराचे नाव आवश्यकच आहे. त्यामुळे सर्वांच्या वतीने मी ज्योतिरादित्य शिंदे यांच्याकडे दिलगिरी व्यक्त करतो.काठीने रक्षण करू का?ज्योतिरादित्य शिंदे यांनी जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी केली. खासदारांच्या हक्कांचे रक्षण व्हायलाच हवे. त्यावर लोकसभाध्यक्ष सुमित्रा महाजन नर्मविनोदी शैलीत म्हणाल्या की, हातात काठी घेऊन मी तुमचे रक्षण करूका? गडकरी यांनी दिलगिरी व्यक्त केली, हा त्यांच्या मनाचा मोठेपणा आहे. यावेळी काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खरगे म्हणाले की, खासदारांना अशा पद्धतीने वागवण्यात येऊ नये.
नितीन गडकरींनी संसदेत व्यक्त केली दिलगिरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2018 1:28 AM