Indian Flag: केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आज(गुरुवार) पंजाबच्या अमृतसर येथे देशातील सर्वात उंच तिरंगा ध्वज फडकावला. देशातील आतापर्यंतचा सर्वात उंच ध्वज येथे बसवण्यात आला आहे. या तिरंग्याची अनेक वैशिष्ट्ये आहेत. हा ध्वज पाकिस्तानच्या सीमेवर लांबून दिसतो. याची उंची 40 मजली इमारतीएवढी आहे.
गुरुवारी दुपारी 3 च्या सुमारास नितीन गडकरी यांनी या उंच खांबावर ध्वाजारोहण केले. भारताने यापूर्वी अटारी सीमेवर सुमारे 360 फूट उंच तिरंगा ध्वज लावला होता. यानंतर पाकिस्तानने येथे सुमारे 400 फूट उंच पाकिस्तानी ध्वज लावला. आता हा नवीन भारतीय ध्वज पाकिस्तानच्या ध्वजापेक्षा 18 फूट उंच आहे. या तिरंगा ध्वजाची उंची 418 फूट असेल.
या ध्वजाच्या खांबाला आधार देण्यासाठी जमिनीवर सुमारे 4 फूट उंचीचा प्लॅटफॉर्मही बांधण्यात आला आहे. हा तिरंगा ध्वज गोल्डन गेटसमोर असलेल्या जुन्या ध्वजापासून थोड्या अंतरावर बनवण्यात आला आहे. हा ध्वज भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने बसवला आहे. हा ध्वज पाकिस्तानच्या सीमेच्या आत अनेक किलोमीटर अंतरावरून स्पष्टपणे दिसतो.
हा भव्य तिरंगा बनवण्यासाठी 90 किलो कापड वापरण्यात आले आहे. या झेंड्याच्या कापडाचे क्षेत्रफळ सुमारे 1100 यार्ड, म्हणजेच लांबी आणि रुंदी 120*80 फूट आहे. आत्तापर्यंत देशातील सर्वात उंच तिरंगा ध्वज कर्नाटकातील बेळगावमध्ये स्थापित करण्यात आला होता, ज्याची उंची सुमारे 360 फूट आहे. हा अटारी सीमेवर लावण्यात आलेल्या ध्वजापेक्षा 0.8 फूट जास्त आहे.