Nitin Gadkari on Electric Bus : "इलेक्ट्रिक बसच्या प्रवाशांचे तिकीट 30 टक्के स्वस्त होऊ शकते", नितीन गडकरींची घोषणा
By ऑनलाइन लोकमत | Published: August 1, 2022 08:02 PM2022-08-01T20:02:08+5:302022-08-01T20:02:56+5:30
Nitin Gadkari on Electric Bus : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सोमवारी इंदूर येथे एका कार्यक्रमादरम्यान सांगितले की, देशभरातील राज्यांच्या रस्ते वाहतूक महामंडळे कधीही नफ्यात येऊ शकत नाहीत, कारण बसेस महागड्या डिझेलवर चालत आहेत.
इंदूर : देशातील सार्वजनिक वाहतूक पायाभूत सुविधांमध्ये डिझेल इंधनाचा वापर कमी करण्यावर केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी भर दिला आहे. ते म्हणाले की, डिझेल बसच्या तुलनेत इलेक्ट्रिक बसच्या प्रवाशांचे तिकीट 30 टक्के स्वस्त होऊ शकते.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सोमवारी इंदूर येथे एका कार्यक्रमादरम्यान सांगितले की, देशभरातील राज्यांच्या रस्ते वाहतूक महामंडळे कधीही नफ्यात येऊ शकत नाहीत, कारण बसेस महागड्या डिझेलवर चालत आहेत. ते म्हणाले, "मी पूर्ण जबाबदारीने बोलत आहे की इलेक्ट्रिक वातानुकूलित बसच्या प्रवाशांचे तिकीट डिझेलवर चालणाऱ्या बसपेक्षा 30 टक्क्यांपर्यंत स्वस्त होऊ शकते. केंद्र सरकार देशभरात 50,000 इलेक्ट्रिक बस चालवण्याच्या योजनेवर पुढे जात आहे."
नितीन गडकरी म्हणाले, "देशाची वाहतूक व्यवस्था दूरदृष्टीने बदलण्याची गरज आहे. पेट्रोल आणि डिझेलऐवजी वाहनांमध्ये वीज, ग्रीन हायड्रोजन, इथेनॉल, बायो-सीएनजी आणि बायो-एलएनजी यांसारख्या स्वस्त इंधनांच्या वापराला अधिकाधिक प्रोत्साहन दिले पाहिजे. अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने पायाभूत सुविधांच्या क्षेत्रातील बांधकामांवर होणारा खर्च कमी करणे अत्यंत गरजेचे आहे, मात्र संपूर्ण सरकारी यंत्रणेला त्याची सवय नाही."
याचबरोबर, "राजकारण्यांनी 50 वर्षे पुढचा विचार केला पाहिजे कारण अनेक सरकारी अधिकारी केवळ पॅच वर्क (समस्या त्वरित सोडवण्यासाठी) करतात. ते फक्त आजच्या कामाचा विचार करतात, कारण येत्या काळात त्यांची बदली होईल असे वाटते", असेही नितीन गडकरी म्हणाले. दरम्यान, या कार्यक्रमादरम्यान नितीन गडकरींनी मध्य प्रदेशात 2,300 कोटी रुपयांच्या पाच रस्ते प्रकल्पांची पायाभरणी केली. अधिकार्यांच्या मते, या प्रकल्पांमुळे मध्य प्रदेशची महाराष्ट्र आणि दक्षिणेकडील राज्यांशी संपर्क सुधारेल आणि रोजगार आणि गुंतवणुकीच्या संधीही वाढतील.
20 उड्डाणपूल बांधण्यास मंजुरी
मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या मागणीनुसार इंदूर, भोपाळ, सागर, ग्वाल्हेर, जबलपूर, रतलाम, खंडवा, धार, छतरपूर आणि विदिशा येथे 20 उड्डाणपूल बांधण्यास मंजुरी दिल्याची घोषणा नितीन गडकरी यांनी केली. नितीन गडकरी म्हणाले की, 2014 सालापासून आतापर्यंत रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने मध्य प्रदेशसाठी 2.5 लाख कोटी रुपयांचे प्रकल्प मंजूर केले आहेत आणि 2024 च्या अखेरीस हा आकडा 4 लाख कोटी रुपयांपर्यंत वाढेल.
यापूर्वी नितीन गडकरी म्हणाले होते की, पुढील 1 वर्षात इलेक्ट्रिक वाहनांची किंमत पेट्रोल वाहनांच्या बरोबरीने असेल. ही बातमी कार आणि दुचाकीस्वारांना दिलासा देणारी आहे. दरम्यान, नितीन गडकरी म्हणाले की, तंत्रज्ञान आणि ग्रीन फ्युएलमध्ये झपाट्याने होणारी प्रगती यामुळे इलेक्ट्रिक ऑटोमोबाईल्सची किंमत कमी होईल.