ऑनलाइन लोकमत
डेहराडून, दि. 27 - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नितीन गडकरींवर स्तुतीसुमनं उधळत आधुनिक श्रावणबाळ असा उल्लेख केला आहे. 'जुन्या काळात आई-वडिलांना यात्रेसाठी घेऊन जाणा-या श्रावणबाळाची ज्याप्रमाणे आठवण काढली जायची. त्याप्रमाणे आधुनिक काळात केदारनाथ, बद्रिनाथची यात्रा सुखरुप होईल तेव्हा लोक सरकार आणि केंद्रीय रस्ते वाहतूक, महामार्ग व जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरींची आठवण काढतील', असं पंतप्रधान नरेंद्र मोदी बोलले आहेत. उत्तराखंडमधील परिवर्तन रॅलीत ते बोलत होते.
'चारधामसाठी बांधण्यात येणा-या रस्त्यांमुळे तरुणांच्या हाताला रोजगार मिळेल', असंही नरेंद्र मोदी बोलले आहेत. 'घाईघाईने बनवण्यात आलेल्या योजना तात्पुरता राजकीय फायदा मिळवून देऊ शकतात, पण त्याला मर्यादा असते. विनाकारण दगडं ठेवली तर योजना तयार होणार का ?', असा टोलाही यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी विरोधकांना लगावला आहे.
'लोकांनी मी काहीतरी करत राहावं यासाठी मला पंतप्रधान केलं आहे. लोकांनी मला सुरक्षारक्षकाचं काम दिलं आहे. मी माझं काम करत आहे तर काहींना त्याचा त्रास होत आहे. हा सुरक्षारक्षक तर सरळ चोरांच्या प्रमुखावरच हल्ला करत असल्याने ते चिंतेत असल्याचं', मोदी बोलले आहेत. ओरओपीवर बोलताना जवानांना त्यांचे पैसे मिळाले पाहिजे यासाठी आम्ही पहिल्या दिवसापासून आग्रही होतो असं सांगितलं आहे.
'नोटाबंदी करुन आम्ही अनेकांना उघडं पाडलं, पण काही लोकांच्या रक्तातच भ्रष्टाचार घुसला आहे. त्यांनी मागून पैसे बदलण्याचा प्रयत्न केला, पण आम्ही त्यावरही उपाय केले होते. नोटाबंदी ही स्वच्छता मोहीम आहे. जोपर्यंत देशवासियांचा सुरक्षाकवच आहे, तोपर्यंत कोणी माझ्याकडे बोट दाखवू शकणार नाही', असं मोदी बोलले आहेत. 'उत्तराखडंला खड्ड्यातून बाहेर काढायचं असेल तर दोन इंजिन लावावे लागणार आहेत, एक दिल्लीचं दुसरं उत्तराखंडचं'. असं सांगत मोदींनी भाजपा सरकार निवडून देण्याचं आवाहन जनतेला केलं आहे.