नागपूर : बिनधास्त स्वभाव आणि कामाची धडाडी या गुणवैशिष्ट्यांमुळे सर्वपरिचित असलेले केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आपल्या पदाचा राजीनामा ‘सरकार’च्या हाती सोपवून हिमालयात जाण्याची घोषणा केल्याने एकच खळबळ उडाली. मात्र, ती जादुगाराची हातसफाई असल्याचे लक्षात येताच गडकरींसह उपस्थिांची हसून हसून पुरेवाट झाली.
घडले ते असे. नागपुरात गडकरी यांच्या जुन्या मित्राकडे दिवाळीनिमित्त स्नेहमिलनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. प्रसिद्ध जादुगार एन. सी. सरकार यांनाही निमंत्रित करण्यात आले होते. जादुचे विविध प्रयोग सादर करून उपस्थितांचे मनोरंजन केल्यानंतर सरकार यांनी आपला मोर्चा नितीन गडकरी यांच्याकडे वळविला. हवेतून सोन्याची साखळी काढून त्यांनी ती गडकरींच्या हाती ठेवली. मात्र, गडकरींनी साखळी घेण्यास नकार दिल्याने जादुगार सरकारांनी ती स्वत:च्या खिशात ठेवून दिली. खरी गंमत आली ती एका प्रशस्तीपत्रामुळे. जादुगार एन. सी. सरकार यांनी गडकरींच्या कार्याचे कौतुक करणारे एक प्रशस्तीपत्र तयार करून आणले होते. ते स्वत: वाचून दाखविले आणि प्रेक्षकांपैकी काही जणांना वाचायला दिले. सर्वांनी ते प्रशस्तीपत्र मोठ्या आवाजात वाचून दाखविले. त्यात गडकरींचे कौतुकच होते. मात्र, तेच पत्र गडकरींना वाचायला दिले असता त्यावर मजकूर होता, ‘‘मी आपल्या पदाचा राजीनामा देत असून संन्यास घेऊन हिमालयात जात आहे. उद्यापासून माझे हे पद एन. सी. सरकार सांभाळतील!’’ हा मजकूर वाचताना गडकरी यांचेही हसून पोट दुखू लागले. दरम्यान, प्रशस्तीपत्राचे रूपांतर जादूगारांनी राजीनाम्यात केले आणि सोपविले गडकरी यांच्या हातात. ते पाहून हसत सुटलेले गडकरी.