नवी दिल्ली : ऑगस्टमध्ये देशात १०० टक्के इथेनॉलवर चालणारी वाहने बाजारात आणली जातील, अशी माहिती केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी दिली. "ऑगस्टपासून इथेनॉलवर १०० टक्के चालणारी वाहने बाजारात लाँच केली जातील. बजाज, टीव्हीएस आणि हिरो कंपन्यांनी १०० टक्के इथेनॉलवर चालणाऱ्या मोटारसायकल बनवल्या आहेत," असे नितीन गडकरी म्हणाले.
टोयोटा कंपनीप्रमाणे ६० टक्के इथेनॉल आणि ४० टक्के इलेक्ट्रिक वाहनेही बाजारात आणणार असल्याचे त्यांनी सांगितले. टोयोटा कंपनीची कॅमरी कार ६० टक्के पेट्रोल आणि ४० टक्के विजेवर चालते आणि या कंपनीच्या माध्यमातून आम्ही अशी आणखी वाहने बाजारात आणणार आहोत, जी ६० टक्के इथेनॉल आणि ६० टक्के विजेवर चालतील. ही देशात एकप्रकारे क्रांतीसारखी असतील, असे नितीन गडकरी म्हणाले.
"प्रत्येकाचे कामे पूर्ण होतील याची मी खात्री करतो. राजकारणाच्या पलीकडे जाऊन मी हे नेहमीच केले आहे. भाजपने आम्हाला सर्वांना न्याय देण्यास शिकवले आहे आणि ते आम्हाला मजबूत बनवते. मी भाजपचा कार्यकर्ता आहे, पण सरकार देशातील जनतेचे आहे. त्यामुळे 'सबका साथ, सबका विश्वास, सबका प्रयास', असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले आहेत," असे नितीन गडकरी यांनी सांगितले.
याचबरोबर, सर्व राज्यात मी राजकारणापासून दूर राहून रस्ते विकासाचे काम केले आहे. भाजपचे सरकार नसलेल्या राज्यांचे मुख्यमंत्री विकास प्रकल्पांवर चर्चा करण्यासाठी मला भेटायला येतात. अलीकडच्या काळात पश्चिम बंगालच्या ममता बॅनर्जी मला भेटायला आल्या आणि त्यांनी अनेक प्रकल्पांवर चर्चा केली, असे नितीन गडकरी म्हणाले.
"जनतेची सेवा करणे हे पहिले कर्तव्य"नितीन गडकरी म्हणाले की, "देशातील रस्ते अनेक राज्यांतून जातात. त्याठिकाणी काँग्रेस किंवा भाजपची सत्ता असू शकते. मात्र, याचा अर्थ काँग्रेसशासित राज्यांमध्ये विकासकामे थांबवावीत, असा अजिबात नाही. देशात जे काही रस्ते बांधले जातात ते येथील लोकांसाठी आहेत. मी भाजपचा कार्यकर्ता आहे, पण पहिल्यांदा मी भारत सरकारचा मंत्री आहे आणि माझी पहिली जबाबदारी आणि कर्तव्य हे देशातील जनतेची सेवा आहे."