केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी सोमवारी लोकांची मने जिंकली आहेत. खराब रस्त्यावरून गडकरींनी लोकांची माफी मागितली आहे. केंद्रीय मंत्री मध्य प्रदेशच्या दौऱ्यावर होते. यावेळी मंडलाच्या खराब रस्त्यावरून त्यांनी लोकांना उद्देशून तुम्हाला त्रास झाला, मी माफी मागतो, असे म्हटले.
मंडलामधील रस्त्यांच्या भूमीपूजन कार्यक्रमाला गडकरी आले होते. यावेळी त्यांच्याकडे जबलपुर-मंडला या ४०० कोटींच्या रस्त्याचे खराब काम झाल्याची तक्रार लोकांनी केली. यावर गडकरींनी जर चूक झाली असेल तर माफीही मागायला हवी. ४०० कोटींचा खर्च करून ६३ किमी लांबीच्या दोन लेनचा रस्ता बनविणे सुरु आहे. मी रस्त्याच्या कामावर खूश नाहीय, असे गडकरी म्हणाले.
यानंतर लगेचच गडकरींनी या हायवेचे उर्वरीत काम तात्काळ रोखावे, जुने जे काम झालेय त्याची तातडीने दुरुस्ती करावी, नवीन टेंडर काढून चांगला रस्ता करावा, असे आदेश दिले. याचबरोबर आलेल्या लोकांना त्यांनी तुम्हाला जो त्रास झालाय, त्यासाठी मी माफी मागतो, असे म्हणाले.
केंद्रीय राज्यमंत्री फग्गन सिंह कुलस्ते यांनी लोकांची तक्रार गडकरींपर्यंत पोहोचविली होती. यावर गडकरींनी कंत्राटदाराकडून ते काम काढून घेण्याचे आदेश दिले. गडकरी मंडलामध्ये 1261 कोटींच्या एकूण 329 किमी लांब ५ राष्ट्रीय राजमार्गांच्या कामाचा शिलान्यास करण्यासाठी तिथे पोहोचले होते.