सध्या देशात इलेक्ट्रीक वाहनांची मागणी (Electric Vehicles In India) मोठ्या प्रमाणात वाढली आहे. अनेक मोठ्या कंपन्या आता इलेक्ट्रीक कार्सच्या उत्पादनात उतरल्या आहेत. एकीकडे पेट्रोल डिझेलच्या वाढत्या किंमतींच्या पार्श्वभूमीवर ग्राहकही अन्य पर्यायांच्या शोधात आहेत. परंतु सध्या इलेक्ट्रीक गाड्यांची किंमत तुलनेनं अधिक असल्यानं ग्राहक ते घेण्यापूर्वी अनेकदा विचार करताना दिसतात. परंतु आता अशा लोकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. पुढील दोन वर्षांमध्ये इलेक्ट्रीक आणि पेट्रोल गाड्यांची किंमत एकसमान होणार असल्याची माहिती केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी दिली. तसंच या क्षेत्रात लवकरच क्रांती घडणार असल्याचं त्यांनी सांगितलं.
"दोन वर्षांच्या आत इलेक्ट्रीक वाहनांच्या उत्पादनासाठी लागणारा खर्च हा पेट्रोल व्हेरिअंटच्या बरोबर हगोणार आहे. सरकार इलेक्ट्रीक वाहनांच्या चार्जिंग सुविधांचा विस्तार करण्यावर काम करत आहे. २०२३ पर्यंत देशातील प्रमुख महामार्गांवर ६०० इलेक्ट्रीक चार्चिग पॉईंट्स सुरू केले जाणार आहेत. हे सौर ऊर्जेवर किंवा पवन ऊर्जेवर चालवले जाऊ शकतात का यावरही विचार सुरू आहे," असं गडकरी म्हणाले.
किंमत कमी होणार"इलेक्ट्रीक वाहनांची संख्या कमी असल्यामुळे त्यांच्या उत्पादनाचा खर्च अधिक आहे. भारतात EV क्रांतीची अपेक्षा आहे. यामध्ये २५० स्टार्टअप्स परवाडणाऱ्या इलेक्ट्रीक वाहनांच्या उत्पादनाचं काम करत आहेत. याशिवाय अनेक वाहन उत्पाद ईव्हीच्या उत्पादनासाठी लागणाऱ्या खर्चात कपात करण्याचा प्रयत्न करत आहेत. इलेक्ट्रीक वाहनांवर जीएसटी केवळ ५ टक्के आहे आणि लिथियम आयन बॅटरीच्या उत्पादनासाठी येणारा खर्चही कमी होत आहे," असं ते म्हणाले.
सर्वात स्वस्त वाहतूकप्रति किलोमीटर येणाऱ्या कमी खर्चामुळे भारतात इलेक्ट्रीक वाहनांची अधिक विक्री होईल अशी अपेक्षा गडकरी यांनी व्यक्त केली. "पेट्रोलवर चालणाऱ्या इलेक्ट्रीक कारची किंमत प्रति किमी १० रूपये, डिझेलच्या गाड्यांसाठी ७ रूपये, तर इलेक्ट्रीक गाड्यांसाठी प्रति किमी १ रूपया खर्च येतो," असंही त्यांनी स्पष्ट केलं.