नवी दिल्ली - केंद्रीय मंत्री आणि भाजपाचे नेते नितीन गडकरी लोकसभा निवडणूक 2019मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना रिप्लेस करणार आहेत का?, यावरुन सध्या जोरदार चर्चा रंगली आहे. या चर्चांना स्वतः गडकरी यांनी पूर्णविराम दिला आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत पंतप्रधानपदाचे उमेदवार होणार असल्याचे वृत्त गडकरी यांनी फेटाळले आहे. याबाबत नितीन गडकरी यांनी स्पष्ट सांगितले की, मी पंतप्रधान बनण्याची कोणतीही शक्यता नाहीय. आता याक्षणी माझ्याकडे जे पद आहे, त्यावर मी खूश आहे.
दरम्यान, लोकसभा निवडणूक 2019 मध्ये भाजपाचे नेतृत्व नितीन गडकरी यांच्याकडे सोपवण्यात यावे, अशा आशयाचे मागणी करणारे पत्र शेतकरी नेते किशोर तिवारी यांनी आरएसएला लिहिले होते. तिवारींच्या या मागणीमुळे गडकरी लोकसभा निवडणुकीत पंतप्रधानपद उमेदवारीच्या शर्यतीत उतरणार आहेत का? यावरुन तुफान चर्चा रंगू लागली. मात्र पंतप्रधान बनण्याची इच्छा नसल्याचं सांगत त्यांनी या वादावर पडदा टाकला आहे.
(भाजपाचे नेतृत्व नितीन गडकरींकडे देण्याची काळाची गरज - किशोर तिवारी)
किशोरी तिवारींची मागणीनुकतेच पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे निकाल लागले. यामध्ये भाजपाचा पराभव झाला. या निवडणुकांदरम्यान पक्षाची धुरा नितीन गडकरींच्या हातात देण्यात आली असती तर मध्य प्रदेश व राजस्थानमध्ये भाजपाची सत्ता हमखास आली असती तसेच छत्तीसगड आणि तेलंगणा भाजपाची अशी दैनावस्था झाली नसती. देशाला विकासाची व युवकांना रोजगाराची आवश्यकता असताना अतिरेकी भूमिका घेणारे, हुकूमशाहीने पक्षाला आणि सरकारला चालविणारे नेते समाज आणि देशासाठी घातक सिद्ध होतात, हा इतिहास भारताला नवीन नाही तर त्याच्या पुनरावृत्तीची आज गरज नसल्यामुळे भाजपाने आपले नेतृत्व नितीन गडकरी यांना देऊन डिसेंबर 2012 मध्ये केलेली चूक दुरुस्त करण्याची विनंती किशोर तिवारी यांनी केली आहे.
(भाजपाच्या काही नेत्यांनी तोंडं बंद ठेवण्याची गरज- नितीन गडकरी)
एएनआयला दिलेल्या मुलाखतीत गडकरींनी सांगितले की, आता माझ्याकडे असलेल्या पदावर मी खूश आहे. अद्याप मला गंगा अभियानासंदर्भातील बरीच कामं पूर्ण करायची आहेत. भारताचे रस्ते 13-14 देशांपर्यंत पोहोचावेत, या उद्देशानं कित्येक एक्स्प्रेस हायवे बांधायचे आहेत. चार धामसाठीही रस्त्यांचे बांधकाम सुरू करायचे आहे. सोबत अन्यही काही कामं आहेत, जी पूर्ण करायची आहेत. ही सर्व कामं पूर्ण करण्याची मला इच्छा आहे आणि मी यामध्ये खूश आहे.
तर दुसरीकडे,गडकरी यांनी विरोधकांच्या महाआघाडीवरही यावेळेस निशाणा साधला. विरोधकांची महाआघाडी म्हणजे नाईलाज असल्याचा टोला गडकरींनी लगावला. राजकारण म्हणजे तडजोड आणि मर्यादांचा खेळ आहे. आपण स्पर्धक पक्षाचा पराभव करू शकत नाही, हे जेव्हा एखाद्या पक्षाला समजते. तेव्हा असे काही पक्ष आघाडी करुन एकत्र येतात. ही आघाडी आनंदानं स्थापन केली जात नाही तर केवळ नाईलाजास्तव केली जाते.
पुढे ते असंही म्हणाले की, पंतप्रधान मोदी आणि भाजपाच्या भीतीपोटी हे सर्व पक्ष आज एकत्र आले आहेत. जे कधीकाळी एकमेकांसोबत बोलणीदेखील करत नव्हते.
दरम्यान, तीन राज्यांमध्ये झालेल्या भाजपाच्या पराभवावरही गडकरींनी प्रतिक्रिया दिली. 'मी हा पराभव मानत नाही कारण भाजपा आणि काँग्रेसच्या जागांमध्ये जास्त अंतर नव्हते. ज्या काही त्रुटी असतील त्यावर आम्ही आगामी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने काम करू. आम्ही 2019मधील लोकसभा निवडणुकीत विजय मिळवू आणि मोदींनी पुन्हा पंतप्रधान बनवू', असा विश्वास गडकरी यांनी व्यक्त केला आहे.