नवी दिल्ली : रस्ते बांधणी क्षेत्रात भारतात मोठ्या प्रमाणावर काम केले जात आहे. रस्ते बांधणीसंदर्भात भारताने चार विश्वविक्रमांना गवसणी घातली आहे. दिल्ली- वडोदरा-मुंबई द्रुतगती महामार्गाच्या कामादरम्यान भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (NHAI) सर्वाधिक प्रमाणात काँक्रिटचा वापर करून द्रुतगती महामार्गाचे काम करण्याचा जागतिक विक्रम मोडीत काढला आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी ट्विटरवरून यासंदर्भात माहिती दिली आहे.
दिल्ली-वडोदरा-मुंबई द्रुतगती महामार्ग तयार करताना २४ तासांच्या कालावधीत झालेल्या कामामुळे चार विक्रम मोडीत निघाले आहेत. देशासाठी पायाभूत सुविधा पूर्वी पेक्षा अधिक वेगाने तयार करण्यात येत आहेत. केवळ नवीन मापदंड घालून दिले नाही, तर आम्ही जागतिक विक्रमही केला आहे, असे नितीन गडकरी यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.
या ट्विटमध्ये एक फोटो शेअर करत नितीन गडकरी यांनी कोणते चार विक्रम मोडीत निघाले आहेत, त्याबाबत माहिती दिली आहे. एक म्हणजे रस्ता निर्माण करण्यासाठी २४ तासांमध्ये पीक्यूसीचा सर्वाधिक वापर केला गेला. दुसरे म्हणजे २४ तासांमध्ये पीक्यूसीचे सर्वाधिक उत्पादन केले गेले. तिसरे म्हणजे पीक्यूसीने २४ तासांपर्यंत सलग १८.७५ मीटर रुंद रस्ते निर्मिती करण्यात आली. आणि चौथे म्हणजे २४ तासांमध्ये द्रूतगती मार्गावरवर पीक्यूसीच्या वापराने जेवढा रस्ता तयार केला गेला, तो देखील एक विश्वविक्रम आहे, असे गडकरी यांनी सांगितले.
केंद्राकडे राज्याच्या जीएसटीचे साडेबावीस हजार कोटी थकीत - सुप्रिया सुळे
देवेंद्र फडणवीसांनी केले अभिनंदन
माजी मुख्यमंत्री व विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे अभिनंदन करत शुभेच्छाही दिल्या आहेत. आपला देश व मुंबईसाठी ही मोठी कामगिरी आहे. रस्ते विकास प्रकल्पांच्या या आश्चर्यकारक गतीबद्दल नितीन गडकरीजी तुमचे खूप अभिनिंदन, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.