जयपूर - केंद्रीय रस्ते वाहतून आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आज जयपूरमधील राजस्थान विधानसभेमध्ये एका संसदीय परिसंवादामध्ये भाग घेतला होता. तिथे हलक्या फुलक्या वातावरणामध्ये गडकरींनी जोरदार राजकीय टोलेबाजीही केली. (Nitin Gadkari)‘’कुणी मंत्री न बनल्याने दु:खी, तर कुणाला खुर्ची जाण्याची भीती वाटत आहे’’, असा टोला गडकरी यांनी लगावला. ("Someone is sad not to become a minister, but someone is afraid of losing his seat", Nitin Gadkari)
नितीन गडकरी यांनी राजकीय पक्षांमध्ये सुरू असलेल्या उलथापालथीवर कुणाचेही नाव न घेता टोला लगावला. ते म्हणाले समस्या सगळ्यांसोबत आहे. पक्षात आहे आणि पक्षा बाहेरही आहे. ते म्हणाले की, आजच्या परिस्थितीत प्रत्येकजण दु:खी आहे. कुणी मंत्री न बनल्याने दु:खी आहे. तर मुख्यमंत्री कधी खुर्ची जाईल, या भीतीने दु:खी आहेत.
राजस्थान विधानसभेमध्ये संसदीय लोकशाहीवरील सेमिनारला संबोधित करताना गडकरी यांनी अनेकदा राजकीय चिमटे काढले. मात्र त्यांनी यादरम्यान, कुणाचेही नाव घेतले नाही. यावेळी गहलोत सरकारलाही त्यांनी चिमटा काढला. ते म्हणाले आमदारांना मंत्री न बनल्याचं दु:ख आहे. तर मंत्री चांगलं खातं न मिळाल्याने दु:खी आहे. ज्याच्याकडे चांगलं खातं आहे ते मुख्यमंत्री न बनल्याने दु:खी आहेत. तर मुख्यमंत्री हे पदावरून हटवण्यात आल्याच्या भीतीने दु:खी आहेत. गडकरी यांनी राजकारणात येणाऱ्या उतार-चढावांबाबत सांगितले की, एकदा नागपूरमध्ये त्यांच्या एका काँग्रेसमधील मित्राने त्यांना काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याचे आमंत्रण दिले होते. मात्र मी विचारसरणीशी तडजोड केली नाही.