नवी दिल्ली- आध्यात्मिक धर्मगुरू भय्यूजी महाराज यांनी आत्महत्या केल्यानंतर राजकीय क्षेत्रातून अनेकांनी दुःख व्यक्त केलं आहे. भय्यूजी महाराजांची सुसाईड नोटही सापडली असून, त्यांनी कौटुंबिक तणावाला कंटाळून आत्महत्या केल्याचा उल्लेख केला आहे. या घटनेवर नितीन गडकरींनी दुःख व्यक्त केलं आहे. भय्यूजी महाराज यांच्या आकस्मिक निधनाने सामाजिक आणि आध्यात्मिक क्षेत्रात मोलाचे योगदान देणारे एक सेवाभावी व्यक्तिमत्त्व आपण गमावले आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्रद्धांजली अर्पण केली आहे. भय्युजी महाराजांच्या अकस्मात निधनाचे वृत्त अत्यंत धक्कादायक व अविश्वसनीय आहे. अध्यात्म क्षेत्रात महाराष्ट्राचा वारसा पुढे चालविण्याचे काम त्यांनी जोपासले होते. कायम हसतमुख, उत्साही आणि ऊर्जा प्रदान करणाऱ्या भय्युजी महाराजांचे अकाली निधन चटका लावणारे आहे.
मुख्यमंत्री आपल्या शोकसंदेशात म्हणतात, भय्यूजी महाराज यांच्या आध्यात्मिक विचारधारेचे अधिष्ठान लोकसेवा हेच होते. त्यांनी सूर्योदय परिवाराच्या माध्यमातून समाजहितासाठी राबविलेल्या विविध उपक्रमांचा वंचित आणि उपेक्षित समाजघटकांना मोठा लाभ झाला आहे. विशेषतः जलसंधारण, भूमी सुधारणा, शिक्षण क्षेत्रासह सामुहिक विवाह चळवळीतही त्यांनी लक्षणीय काम केले होते. विशेषतः महाराष्ट्र आणि मध्यप्रदेशमध्ये त्यांनी केलेल्या जलसंधारणाच्या कामामुळे हजारो हेक्टर जमिनीला पाणी मिळाले आहे. त्यांच्या निधनाने समाजाला विधायकतेसाठी उद्युक्त करणारा प्रेरणास्रोत हरपला आहे.
आध्यात्मिक गुरु श्री भय्यूजी महाराज यांच्या निधनाची दु:खद बातमी कळली. त्यांच्याशी माझे व्यक्तिगत जिव्हाळ्याचे संबंध होते. त्यांचा हा अकाली मृत्यू मनाला चटका लावणारा आहे. माझी विनम्र श्रद्धांजली, असं ट्विट करत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले आहेत. माजी रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांनी ट्विट करत भय्यूजी महाराज यांच्या आत्महत्येवर दु:ख व्यक्त केले आणि त्यांना श्रद्धांजली वाहिली.