केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारच्या विरोधात काँग्रेसनं फुंकलेलं रणशिंग, विरोधकांची महाआघाडी उभी करण्यासाठी त्यांच्या सुरू असलेले प्रयत्न, राहुल गांधी आणि अन्य नेत्यांकडून पंतप्रधान मोदींवर होणारे शाब्दिक हल्ले, हे चित्र अगदी रोज पाहायला मिळतंय. अशातच, प्रजासत्ताक दिनी भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि मोदी सरकारमधील मंत्री नितीन गडकरी हे राहुल गांधीशी गुफ्तगू करताना दिसल्यानं अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या, कान टवकारले होते. अखेर, त्यावेळी राहुल यांच्यासोबत झालेली चर्चा गडकरींनी उघड केली आहे.
नितीन गडकरी हे पंतप्रधानपदाच्या शर्यतीत असल्याची चर्चा काही काळापासून माध्यमांमध्ये आहे. अलीकडची त्यांची काही विधानं अप्रत्यक्षपणे पंतप्रधान नरेंद्र मोदींना लक्ष्य करणारी होती. याउलट, पंडित नेहरु आणि इंदिरा गांधी यांच्या कामाचं त्यांनी जाहीर भाषणात कौतुक केलं होतं. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी त्यांची असलेली जवळीक पाहता, गडकरींची विधानं ही संघाची तर नाहीत ना, संघ मोदींवर नाराज आहे का, असे तर्कवितर्क लढवले जात होते. या पार्श्वभूमीवरच, नितीन गडकरी आणि राहुल गांधी शेजारी-शेजारी बसल्याचं, गप्पांमध्ये रंगल्याचं दिसलं. स्वाभाविकच, त्यांच्यात काय चर्चा झाली असेल, याबद्दल सगळ्यांनाच उत्सुकता होती. आज स्वतः गडकरींनीच या प्रश्नाचं आपल्या शैलीत उत्तर दिलं.
'प्रजासत्ताक दिनी केल्या जाणाऱ्या आसनव्यवस्थेत माझ्या शेजारची खुर्ची काँग्रेस अध्यक्षाची असते. त्यामुळे आधी माझ्या शेजारच्या खुर्चीवर सोनिया गांधी बसायच्या. यावेळी राहुल गांधी बसले होते. समोरून अनेक चित्ररथ जात असल्यानं त्याबद्दल आम्ही अधे-मधे बोलत होतो. राहुल गांधी काय पाकिस्तानचे आहेत का? आणि आपण तर पाकिस्तानशीही चर्चा करतोच की', असं गडकरी हसत-हसत म्हणाले.
मला पंतप्रधानपदाची लालसा नाही, मला कुवतीपेक्षा खूप मिळालंय, मी कुणाच्याही इशाऱ्यांवर बोलत नाही, असंही नितीन गडकरींनी स्पष्ट केलं. माझ्या विधानांची तोडमोड करून हवं ते दाखवलं जात असल्याचं ते म्हणाले. मोदी सरकारच्या काळात गंगा नदीची स्वच्छता आणि गावागावात झालेलं विद्युतीकरण उल्लेखनीय असल्याचंही त्यांनी नमूद केलं.