नितीन गडकरी असतील पुढचे पंतप्रधान- प्रकाश आंबेडकर
By ऑनलाइन लोकमत | Published: February 26, 2019 09:26 PM2019-02-26T21:26:04+5:302019-02-26T21:29:24+5:30
भारिप बहुजन महासंघाच्या प्रकाश आंबेडकर यांचं भाकीत
मुंबई: केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी देशाचे पुढील पंतप्रधान असतील, असं भाकीत भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी वर्तवलं. गडकरी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पुढील पंतप्रधान असतील, असं म्हणत आंबेडकर यांनी काँग्रेसलादेखील लक्ष्य केलं. संघ आणि काँग्रसचे विचार जुळतात, अशा शब्दांमध्ये आंबेडकर यांनी काँग्रेसला लक्ष्य केलं. त्यामुळे भारिप बहुजन महासंघ महाआघाडीत सहभागी होण्याची शक्यता धूसर झाली आहे.
भारिप बहुजन महासंघाला महाआघाडीत घेण्यासाठी काँग्रेसचे प्रयत्न सुरू आहेत. धर्मनिरपेक्ष मतांसाठी भारिपनं महाआघाडीत यावं, असं काँग्रेस नेत्यांनी अनेकदा म्हटलं आहे. काल झालेल्या काँग्रेसच्या बैठकीतदेखील भारिपला महाआघाडीत घेण्याबद्दल चर्चा झाली. त्यांना 4 जागा देण्याची तयारीदेखील काँग्रेसनं दर्शवली. मात्र आता आंबेडकर यांनी संघ आणि काँग्रेसचे विचार जुळत असल्याचं म्हटल्यानं महाआघाडीला धक्का बसण्याची शक्यता आहे. लोकसभा निवडणुकीसाठी भारिपनं असदुद्दीन ओवेसी यांच्या एमआयएमशी हातमिळवणी करत वंचित बहुजन विकास आघाडी स्थापन केली आहे.
राज्यात लोकसभेच्या 48 जागा आहेत. यातील 8 जागा मित्रपक्षांना देण्याची तयारी काँग्रेस, राष्ट्रवादीनं दर्शवली आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटना, सीपीएम आणि भारिपला 8 जागा देण्याचा निर्णय काँग्रेस, राष्ट्रवादीनं घेतला आहे. मात्र वंचित बहुजन विकास आघाडीला 12 जागा हव्या आहेत. भारिपनं आघाडीत यावं. मात्र एमआयएमला आघाडीत स्थान नसेल, अशी अट काँग्रेसनं घातली आहे. यावरुन आंबेडकरांनी काँग्रेसला लक्ष्य केलं. 'भाजपाच्या कट्टर हिंदुत्वाविरोधात काँग्रेसनं मवाळ हिंदुत्वाचा मार्ग धरला आहे. मवाळ हिंदुत्व आणि मनुवाद यावर काँग्रेस आणि संघाचे विचार जुळतात,' अशी टीका आंबेडकरांनी केली.