Nitin Gadkari advice to BJP In Goa: भारतीय जनता पक्ष हा वेगळ्या प्रकारचा पक्ष आहे आणि त्यामुळेच या पक्षाने पुन्हा एकदा मतदारांचा विश्वास जिंकला आहे. पण ज्या चुका काँग्रेसने केल्या त्याच चुका भाजपाला करून चालणार नाही, असा मोलाचा सल्ला भाजपाचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आपल्याच पक्षाला दिला. गोव्यातील ताळेगाव येथे भाजपच्या गोवा प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीत गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्यात उपस्थितीत त्यांनी हे विधान केले. तसेच, काँग्रेसने आधी केलेल्या चुका भाजपाने केल्यास काय होईल, याबाबतही त्यांनी वक्तव्य केले.
भाजपही त्याच चुका करू लागला, तर...
आपल्या भाषणात नितीन गडकरी म्हणाले, "नेत्यांनो आणि कार्यकर्त्यांनो भूतकाळात काँग्रेसने केलेल्या चुका आपण पुन्हा करू नये. त्या चुकांमुळेच काँग्रेसला सत्तेतून बाहेर पडावे लागले. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपला स्वबळावर बहुमत मिळालेले नाही. आपण हे लक्षात ठेवायला हवे की काँग्रेसने ज्या चुका केल्या त्याच चुका जर आपणही करत राहिलो तर काँग्रेसला सत्तेबाहेर फेकण्याचे आणि जनतेने आपल्याला सत्ता दिल्याचा काहीच उपयोग होणार नाही. आमचा राजकीय पक्ष हा वेगळ्या विचारांचा आहे असे लालकृष्ण अडवाणी म्हणत असत. आपण इतर पक्षांपेक्षा वेगळे कसे आहोत हे आपण समजून घेतले पाहिजे. आपण काँग्रेसपेक्षा वेगळे आहोत. राजकीय पक्ष आणि राजकारण हे सामाजिक आणि आर्थिक बदल घडवण्याचे माध्यम आहे हे आपण सर्वांनी नीट समजून घेतले पाहिजे."
"सध्या देशात काही लोक जातीपातीचे राजकारण करत आहेत. महाराष्ट्रात हा प्रकार घडताना स्पष्ट दिसत आहे. मी मात्र या जातीपातीच्या राजकारणात अडकणार नाही आणि इतरांनाही उगाच त्या मार्गाने जायला लावणार नाही. मी माझ्या कार्यकर्त्यांना स्पष्ट सांगितले आहे की मी जातीपातीचे राजकारण करणार नाही. जो जातीपातीचे राजकारण करेल त्याला फटके पडतील. (जो करेगा जात की बात, उसको पडेगी कस के लाथ)," असेही गडकरींनी नमूद केले.