- विकास झाडे नवी दिल्ली : वाहनाची तपासणी करून प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्र घेतल्यानंतरच वाहन रस्त्यावर आणता येते. अन्यथा १० हजार रुपये दंड व सहा महिन्यांपर्यंत शिक्षा भोगावी लागते, परंतु केंद्रीय परिवहनमंत्री नितीन गडकरी यांच्या दिल्लीतील कारचे प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्र पुणे, नागपूर व चंद्रपूर येथून उपलब्ध झाल्याने पीयूसी यंत्रणेचा भ्रष्टाचार उघड झाला आहे.‘लोकमत’ने पुणे, नागपूर व चंद्रपूर येथील पाच सामान्य नागरिकांना एमएच४९एई२७०० या वाहनाचा नंबर पाठवून त्याचे पीयूसी प्रमाणपत्र मागविले. पुण्यातून तीन प्रमाणपत्रे देण्यात आली. एक भोसरीतील साई पीयूसी सेंटरमधून आणि अन्य दोन जंगली महाराज रोडवरील कलमाडी पेट्रोल पंपातून मिळाली. तिथे तर पुढच्या वर्षीचेही पीयूसी देण्यात आले. गडकरींच्या नागपूरमधून आरटीओ परिसरातून पाच मिनिटांत पीयूसी मिळाले. चंद्रपूरमधून दोन वेगवेगळ्या सेंटरहून प्रमाणपत्र तातडीने मिळाले. एकानेही गाडी कुठे आहे? हा प्रश्न केला नाही आणि गाडी तपासण्याची त्यांना गरजही वाटली नाही.>ज्या कारचे प्रमाणपत्र देण्यात आले, ती कार नितीन गडकरी यांच्या नावावर असून तीन वर्षांपासून दिल्लीत आहे. गडकरी स्वत: ही कार वापरतात. कायद्याची अंमलबजावणी करताना, त्यातील भ्रष्ट यंत्रणांना चाप बसवणे गरजेचे झाले आहे.>१00 रुपयांत प्रमाणपत्रवाहन प्रदूषण करीत असल्यास २४ तासांत सर्व्हिसिंग करून प्रदूषण नियंत्रणात आणावे लागते. त्यानंतरच प्रमाणपत्र मिळते.वाहनाच्या मॉडेलनुसार ३, ६ व १२ महिन्यांसाठी प्रमाणपत्र दिले जाते. कोणत्याही राज्याने दिलेले पीयूसी देशभर चालते.पीयूसीमध्ये प्रचंड भ्रष्टाचार सुरू आहे. महाराष्टÑात वाहन तपासणीसाठी न नेताही पीयूसी प्रमाणपत्र सर्रास १०० रुपयांमध्ये दिले जाते.
गडकरींच्या दिल्लीतील कारचे पुणे, नागपूर, चंद्रपूर येथून निघाले ‘पीयूसी’ प्रमाणपत्र
By ऑनलाइन लोकमत | Published: September 17, 2019 6:18 AM