नवी दिल्ली - केंद्रीय मंत्री नितीन गडकरी त्यांच्या विकासकामांमुळे देशभरात चर्चेत असतात. सत्ताधारी पक्षाचे नेते असले तरी नितीन गडकरींसोबत चांगले संबंध विरोधी पक्षासोबत सगळ्यांशी आहेत. गडकरी यांच्याकडे रस्ते व महामार्ग विकास मंत्रालय आहे. देशभरातील रस्त्यांच्या प्रकल्पात त्यांचं योगदान खूप मोठं आहे. आता नितीन गडकरींनी भाजपा खासदाराला दिलेल्या एका ऑफरमुळे चांगलेच चर्चेत आले आहेत.
नितीन गडकरी(Nitin Gadkari) यांनी मध्य प्रदेशातील उज्जैन येथील खासदार अनिल फिरोजिया(Anil Firojia BJP) यांना कोट्यवधीची ऑफर दिलीय. या वजनदार नेत्याला त्याचे वजन कमी करण्यासाठी गडकरींनी ही ऑफर दिली. या खासदाराचे वजन १२७ किलो होते. वजन कमी करा जर हे शक्य केले तर त्यांना कमी होणाऱ्या प्रत्येक किलो वजनामागे १ हजार कोटी देण्याचं आश्वासन गडकरींनी दिले. विश्वास बसला नसेल परंतु गडकरींनी त्यांच्या हटके कामानं सर्वांनाच आश्चर्य केले आहे.
अलीकडेच नितीन गडकरी यांनी अमरावती ते अकोला ७५ किमी हायवे अवघ्या ५ दिवसांत बनवून दाखवला. त्याची नोंद गिनीज बुकात झाली. आगामी काळात भारतातील रोड हे अमेरिकेसारखे असतील असंही गडकरी कायम सांगतात. नितीन गडकरी जे बोलतात ते करून दाखवतात. त्यामुळे गडकरींनी दिलेली ऑफरही चर्चेत आली. केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी दिलेली ऑफर खासदार अनिल फिरोजिया यांनीही चांगलीच मनावर घेतली.
आता फिरोजिया यांनी निश्चिय केलाय की, २७ किलो वजन कमी करणार, मग नितीन गडकरींनी २७ हजार कोटी द्यावे लागतील. गडकरी इतका पैसा आणणार कुठून? की इथंदेखील पीडीपी मॉडेल वापरणार? अशी चर्चा होती. खासदार अनिल फिरोजिया यांना ही ऑफर नितीन गडकरींनी २४ फेब्रुवारीला दिली होती. त्यानंतर गडकरींची ऑफर पाहून फिरोजिया यांनी ४ महिने डायट प्लॅन, मेहनत घेत १५ किलो वजन कमी करून दाखवले. त्यामुळे आता नितीन गडकरींना १५ हजार कोटी रुपये द्यावे लागणार आहेत. फेब्रुवारीत गडकरी विकास कामांचे उद्धाटन करण्यासाठी उज्जैनला पोहचले होते. तेव्हा ही ऑफर दिली होती. अनिल फिरोजिया यांनीही ती ऑफर मनावर घेतली आणि वजन कमी केले. त्यामुळे हा गडकरी उज्जैनच्या विकास कामासाठी निधी म्हणून १५ हजार कोटी देणार असल्याची बातमी आहे.