हरिश गुप्ता
नवी दिल्ली : ‘ईडी’चे संचालक संजयकुमार मिश्रा यांना तिसऱ्यांदा दिलेली मुदतवाढ बेकायदेशीर असून, त्यांचा कार्यकाळ येत्या ३१ जुलै रोजी संपविण्यात यावा, असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिल्यानंतर त्यांचा उत्तराधिकारी शोधण्यास केंद्र सरकारने हालचाली सुरू केल्या आहेत. केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाचे (सीबीडीटी) अध्यक्ष नितीन गुप्ता यांचे नाव ईडीच्या संचालकपदासाठी आघाडीवर असून, आणखी काही वरिष्ठ अधिकारीही शर्यतीत आहेत.
ईडीच्या संचालक पदाच्या शर्यतीत नितीन गुप्ता यांच्यासोबतच प्रवीणकुमार (आयआरएस - १९८७ची तुकडी) यांचे नाव चर्चेत असून ते सीबीडीटीचे सदस्य आहेत. ते नितीन गुप्ता यांच्यानंतर एक वर्षाने आयआरएस झाले. ईडीचे संचालकपद अतिशय संवेदनशील स्वरूपाचे आहे. त्या पदावर नियुक्ती करण्यासाठी केवळ सेवाज्येष्ठताच नव्हे तर इतरही निकष लावले जातात. ईडीच्या संचालकपदासाठी फायनान्शिअल युनिटचे माजी संचालक पंकजकुमार मिश्रा, ईडीचे माजी प्रधान विशेष संचालक सीमांचल दाश यांचीही नावे शर्यतीत आहेत.
अनेक धाडींमुळे चर्चेतनितीन गुप्ता हे आयकर खात्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. त्यांचा सीबीडीटी अध्यक्षपदाचा कार्यकाळ सप्टेंबर २०२३मध्ये संपत आहे. ईडीनंतर आयकर विभागानेच आतापर्यंत विविध प्रकरणांत धाडी टाकल्या व आरोपींना अटक केली आहे. बीबीसीच्या कार्यालयावर काही महिन्यांपूर्वी आयकर खात्याने धाडी टाकल्या होत्या. कमी आयकर भरल्याचे बीबीसीने मान्य केले होते.