नितीन राऊत तामिळनाडूत, तर मुकुल वासनिक आसामचे निरीक्षक
By ऑनलाइन लोकमत | Published: January 8, 2021 05:15 AM2021-01-08T05:15:44+5:302021-01-08T05:16:06+5:30
पाच राज्यांत एप्रिल-मेमध्ये विधानसभा निवडणूक
शीलेश शर्मा
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : आसाम, केरळ, तामिळनाडू, पश्चिम बंगाल आणि पुड्डेचेरीमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकांसाठी काँग्रेस पक्षाने मुख्यमंत्र्यांसह वरिष्ठ नेत्यांना या राज्यांचे पर्यवेक्षक बनवले आहे. निवडणूक प्रचार, व्यवस्थापन आणि समन्वयाची त्यांची जबाबदारी असेल. महाराष्ट्रातील मंत्री नितीन राऊत आणि नेते मुकुल वासनिक यांचा त्यात समावेश आहे.
राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांना केरळची आणि छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांना आसामची जबाबदारी दिली गेली आहे. नितीन राऊत तामिळनाडू आणि पुड्डेचेरीत तर मुकुल वासनिक आसाममध्ये भूपेश बघेल यांच्यासोबत निरीक्षक म्हणून काम पाहतील. काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांनी या नियुक्त्या केल्या असल्याची माहिती पक्षाचे संघटन महासचिव के. सी. वेणुगोपाल यांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात दिली.
अन्य नेत्यांमध्ये शकील अहमद खान, लुईझिनो फेलेरो, जी. परमेश्वर, वीरप्पा मोईली, एम. एम. पल्लम राजू, बी. के. हरिप्रसाद, आलमगीर आलम, विजय इंदर सिंगला यांचा समावेश आहे. हे नेते संबंधित राज्यांच्या प्रभारींसोबत समन्वयाने काम करतील. या पाचही राज्यांत येत्या एप्रिल-मे मध्ये निवडणूक होणार आहे.