पाटणा - पश्चिम बंगालची राजधानी कोलकाता आता केंद्र विरुद्ध राज्य सरकार संघर्षाचं केंद्र झाली आहे. शारदा घोटाळ्यावरुन या संपूर्ण संघर्षाला सुरू झाली. शारदा चिट फंड घोटाळ्याच्या चौकशीसाठी सीबीआयची टीम काल कोलकात्यात पोहोचली. कोलकात्याचे पोलीस आयुक्त राजीव कुमार यांच्या घरावर छापा टाकण्याच्या तयारीत असताना पोलिसांनी सीबीआयच्या अधिकाऱ्यांना ताब्यात घेतलं. यानंतर पश्चिम बंगालमध्ये रणकंदन सुरू झालं. बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी सोमवारी (4 फेब्रुवारी) पश्चिम बंगाल आणि केंद्र सरकारमधील संघर्षांबाबत विचारण्यात आलेल्या प्रश्नाला बगल दिली आहे. लोकसभेच्या निवडणुकांची तारीख जाहीर होईपर्यंत देशात काहीही घडू शकतं, असे त्यांनी म्हटले आहे.
'कोलकात्यात जे घडले त्यावर संबंधित प्रशासन सविस्तर स्पष्टीकरण देईल. अशा गोष्टींवर मी प्रतिक्रिया देत नाही. सीबीआय आणि सरकार यावर बोलतील; पण निवडणुकांची तारीख जोपर्यंत जाहीर होत नाही, तोपर्यंत देशात काहीही घडू शकतं' असं नितीशकुमार यांनी म्हटले आहे. तर दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी व बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांना विरोधी पक्षांची महाआघाडी सत्तेतून नक्की घालवेल, असा दावा काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी ‘जनआकांक्षा' रॅलीमध्ये केला आहे.
राहुल गांधी यांनी देश का चौकीदार चोर है, असा आरोपही पुन्हा केला. राहुल गांधी म्हणाले की, मोदी जिथे जातात तिथे भरभरून आश्वासने देतात. नितीशकुमारही असेच वागत आहेत. शेतकऱ्यांना वार्षिक सहा हजार रुपयांची मदत करण्याची घोषणा केली. ही ऐतिहासिक घोषणा असल्याचे भाजपाला वाटत आहे मात्र शेतकऱ्यांना दिलेली मदत तुटपुंजी आहे. त्यांच्या वाट्याला दरदिवशी फक्त 17 रुपयेच येणार आहेत.