ऑनलाइन लोकमत
पाटणा, दि. २२ - जितनराम मांझी यांनी राजीनामा दिल्यानंतर रविवारी जनता दल संयुक्तचे नेते नितीशकुमार यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. नितीशकुमार यांच्यासह २२ मंत्र्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली.
लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर नितीशकुमार यांनी बिहारच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. यानंतर नितीशकुमार यांनी जितनराम मांझी यांची मुख्यमंत्रीपदावर वर्णी लागली होती. नितीशकुमार यांची पुन्हा मुख्यमंत्रीपदी वर्णी लावण्याची तयारी जदयू नेत्यांनी सुरु केली. याविरोधात मांझी यांनी बंड पुकारले व राजीनामा देण्यास नकार दिला. अखेर मांझी यांनी राजीनामा दिल्याने नितीशकुमार यांचा मुख्यमंत्रीपदावर विराजमान होण्याचा मार्ग मोकळा झाला होता.
रविवारी राज्यपाल केसरीनाथ त्रिपाठी यांनी नितीशकुमार यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. नितीशकुमार यांच्यासह २२ मंत्र्यांनीही शपथ घेतली. यातील २० मंत्री हे मांझी सरकारच्या काळातील आहेत. तर ज्या दोन मंत्र्यांची मांझींनी हकालपट्टी केली होती त्यांनादेखील नितीशकुमार यांच्या मंत्रिमंडळात स्थान देण्यात आले. या शपथविधी सोहळ्याला ममता बॅनर्जी, तरुण गोगोई, बिहारमधील भाजपा नेते सुशीलकुमार मोदी आदी मान्यवर उपस्थित होते. नितीशकुमार यांनी चौथ्यांदा बिहारच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.