पटना : बिहारमध्ये पुन्हा एकदा संयुक्त जनता दलाचे (जेडीयू) नेते नितीशकुमार मुख्यमंत्री होणार आहेत. विधानसभा निवडणुकीत एनडीएला स्पष्ट बहुमत मिळाले आहे. त्यामुळे आता दिवाळीनंतर पुन्हा एकदा नितीशकुमार मुख्यमंत्र्यांची शपथ घेतील. सुत्रांच्या माहितीनुसार, हा शपथविधी सोहळा 16 नोव्हेंबरला होऊ शकतो. नितीशकुमार यावेळी सातव्यांदा बिहारच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतील. याआधी २००० मध्ये ते पहिल्यांदा मुख्यमंत्री झाले. त्यानंतर आतापर्यंत झालेल्या निवडणुकीनंतर बिहारचे मुख्यमंत्री म्हणून नितीशकुमार यांनीच शपथ घेतली आहे.
यंदाच्या बिहार विधानसभा निवडणुकीत राष्ट्रीय लोकतांत्रिक आघाडीमध्ये (एनडीए) भाजपाने सर्वाधिक जागा जिंकल्या. त्यामुळे अशा परिस्थितीत मुख्यमंत्री हा भाजपाचा व्हावा, अशी मागणी काही भाजपचे नेते करीत होते. पण, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी सायंकाळी भाजपाच्या मुख्यालयात कार्यकर्त्यांना संबोधित करताना नितीशकुमार यांच्या नेतृत्वात बिहारमध्ये एनडीएचे सरकार स्थापन करणार असल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे मुख्यमंत्रीपदाबाबत जेडीयू आणि भाजपामध्ये सुरु असलेल्या चर्चेला पूर्ण विराम मिळाला.
दरम्यान, बिहार विधानसभा निवडणुकीत एनडीएला १२५ जागा मिळाल्या आहेत. यामध्ये ७४ भाजपा, ४३ जेडीयू, ४ हम आणि ४ व्हिआयपीला जागा मिळाल्या आहेत. तर तेजस्वी यादव यांच्या नेतृत्वातील महाआघाडीला फक्त ११० जागा मिळाल्या.
नितीशकुमार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मानले आभार!बुधवारी उशिरा सायंकाळी नितीशकुमार यांनी ट्विट करून निवडणुकीच्या निकालावर प्रतिक्रिया दिली. यावेळी जनता मालक आहे आणि त्यांनी एनडीएला पूर्ण बहुमत दिले आहे, असे नितीशकुमार म्हणाले. तसेच, निवडणुकीदरम्यान मिळालेल्या पाठिंब्याबद्दल नितीशकुमार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले.
एनडीएमध्ये ‘चिराग’ नको : नितीशकुमारनिवडणुकीत सातत्याने त्यांच्याविरोधात भूमिका घेणाऱ्या लोकजनशक्ती पार्टीला एनडीएमध्ये स्थान देऊ नये, यासाठी नितीशकुमार यांनी भाजपच्या पक्षनेतृत्वाकडे आग्रह धरला आहे. चिराग यांच्या भूमिकेमुळे नितीशकुमारांना किमान २० जागांवर पराभव पत्कारावा लागला. विशेष म्हणजे, केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या राज्यसभेच्या जागेवर नितीशकुमारांना जायचे नाही. हे सर्व मुद्दे सुटल्याशिवाय जेडीयू केंद्रीय मंत्रिमंडळात सहभागी होणार नाही.
भाजपाला हवी महत्त्वाची खाती भाजपा आणि जेडीयूला आता सत्तेतील वाट्याचा प्रश्न सोडवायचा आहे. विद्यमान उपमुख्यमंत्री सुशील मोदी यांना कायम ठेवायचे झाल्यास भाजपाकडून दोन उपमुख्यमंत्रिपदांची मागणी होऊ शकते. तसेच भाजपाला महत्त्वाची खाती हवी आहेत.