पटना : सध्याचे बिहारमधील मुख्यमंत्री नितीश कुमार यांचे सरकार आपला कार्यकाळ पूर्ण करू शकणार नाही. २०२५ च्या आधी बिहारमध्ये विधानसभा निवडणुका होण्याची शक्यता आहे, असे भाकित लोक जनशक्ती पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि जमुईचे खासदार चिराग पासवान यांनी केले आहे.
लोक जनशक्ती पार्टीच्या स्थापना दिनानिमित्त चिराग पासवान यांनी शनिवारी कार्यकर्त्यांना पत्र लिहिले आहे. चिराग पासवान म्हणाले, "आपण सर्वांनी आतापासून २४३ विधानसभा मतदारसंघासाठी तयारी सुरू केली पाहिजे, जेणेकरून सर्व जागांवर पार्टी बिहारसाठी आपले व्हिजन ठेवू शकेल. बिहार विधानसभेच्या पुढील निवडणुका २०२५ पूर्वी होऊ शकतात."
नुकत्याच झालेल्या बिहार विधानसभा निवडणुकीत पार्टीच्या कामगिरीबद्दल चिराग पासवान यांनी कार्यकर्त्यांना लिहिलेल्या पत्रात समाधान व्यक्त केले. ते म्हणाले की, बिहार विधानसभेच्या निवडणुकीत ज्या पद्धतीने पार्टीची कामगिरी होती, त्यावरून पार्टीचा झपाट्याने विस्तार होत असल्याचे स्पष्ट झाले आहे.
याचबरोबर, "पार्टीला २४ लाख मते मिळाली आहेत. यावरून एलजेपीचा विस्तार स्पष्ट होतो. बिहारमध्ये पार्टीने 'बिहार फर्स्ट बिहारी फर्स्ट'सोबत कोणताही करार केलेला नाही. तसेच, निवडणुकीच्या आधी नवीन लोकांनी पार्टीत प्रवेश केल्यामुळे पार्टी आणखी मजबूत झाली आहे", चिराग पासवान म्हणाले.
दरम्यान, चिराग पासवान यांनी बिहार विधानसभा निवडणूक एनडीएसोबत न लढण्याचा निर्णय का घेतला, याबाबतही भाष्य केले. चिराग म्हणाले की, एनडीएमध्ये लोक जनशक्ती पार्टीला केवळ १५ जागा देण्याचे सांगितले जात होते. ते पार्टीच्या संसदीय मंडळाला मान्य नव्हते. या कारणास्तव बहुतांश जागांवर मैत्रीपूर्ण लढण्याचा निर्णय घेण्यात आला आणि निवडणुकीत पक्षाने १३५ उमेदवार उभे केले.