नवी दिल्ली - जनता दल युनाईटडेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष प्रशांत किशोर पश्चिम बंगालमध्ये भाजपविरोधात मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यासाठी निवडणूक प्रचाराचे काम करणार आहेत. प्रशांत किशोर यांनी तृणमूल काँग्रेस पक्षासोबत काम करण्यासंदर्भात करार केला असल्याचे समोर आले आहे.
आगामी विधानसभा निवडणुकीत प्रशांत किशोर तृणमूलसोबत दिसणार आहेत. प्रशांत किशोर यांनी ममता यांना राजकीय रणनिती ठरविण्यासाठी होकार दिल्यानंतर लगचेच अनेक चर्चांना उधाण आले होते. जदयूचे राष्ट्रीय उपाध्यक्ष असलेल्या प्रशांत किशोर यांना ममता यांचे काम करण्यासाठी नितीश कुमार यांची परवानगी मिळाली का, असा सवाल उपस्थित झाला. काही दिवसांपूर्वीच प्रशांत किशोर यांनी पटना आणि दिल्लीत नितीश कुमार यांची भेट घेतली होती. त्यानंतरच त्यांनी ममता यांना तृणमूलचे काम करण्यासाठी होकार दिला. यावरून प्रशांत किशोर यांना नितीश कुमार यांच्याकडून हिरवा झेंडा मिळाल्याचे समजते.
दुसरीकडे जदयूचे प्रवक्ते अजय आलोक यांनी सांगितले की, प्रशांत किशोर पक्षाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष आहेत. त्यामुळे तृणमूलचे काम करण्यासंदर्भातील निर्णय राष्ट्रीय अध्यक्षांशिवाय होणे अशक्य आहे. सहाजिकच जदयूमध्ये सर्वकाही नितीश कुमार यांच्या आदेशाप्रमाणेच चालतं. त्यामुळे प्रशांत किशोर यांना देखील त्यांनी परवानगी दिली, अशी चर्चा सुरू आहे.
दरम्यान जदयू आणि भाजपमध्ये केंद्रीय मंत्रीपदांवरून मतभेद आहेत. नितीश कुमार यांनी केंद्रीय मंत्रीमंडळात सामील होण्यास नकार दिलेला आहे. त्यामुळे जदयू-भाजप युतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत. प्रशांत किशोर यांनी नुकतेच आंध्रप्रदेशमध्ये वायएसआर काँग्रेसचे काम केले. यामध्ये वायएसआर काँग्रेसने दणदणीत विजय मिळाला आहे. त्यामुळे राजकीय रणनिती ठरविण्यासाठी प्रशांत किशोर यांची मागणी वाढली आहे.