नवी दिल्ली - लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांमध्ये प्रचाराची चढाओढ लागली आहे. ऑल इंडिया मजलिस ए -इत्तेहादुल मुस्लिम(एमआयएम) चे प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनी बिहारमध्ये सभा घेताना नितीश कुमार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार प्रहार चढवला आहे. बिहारमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि नितीशकुमार यांच्यातलं प्रेम लैला-मजनू यांच्या प्रेमापेक्षा अधिक मजबूत आहे असा टोला असदुद्दीन ओवैसी यांनी लगावला आहे. बिहारच्या किशनगंज येथे निवडणुकीच्या प्रचारसभेला संबोधित करताना ओवैसी यांनी हे विधान केलं आहे.
यावेळी बोलताना ओवैसी म्हणाले की, नितीश कुमार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात खूप प्रेम आहे. लैला-मजनू यांच्या प्रेमापेक्षा अधिक मजबूत असं त्यांचे प्रेम आहे. जेव्हा कधीही नितीश कुमार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रेमाबद्दल लिहिलं जाईल तेव्हा या दोघांतील लैला कोण? आणि मजनू कोण? हे मला विचारू नका, त्यांचा निर्णय तुम्ही करा असं ओवैसी यांनी सांगितले.
बिहारमध्ये एकूण लोकसभेच्या 40 जागा आहेत ज्यामध्ये प्रत्येकी 17 जागा भारतीय जनता पार्टी आणि जनता दल यूनाइटेड निवडणूक लढवत आहे. तर इतर 6 लोकसभा मतदारसंघात लोक जनशक्ती पार्टी निवडणूक लढवत आहे. बिहारच्या किशनगंज, पूर्णिया आणि कटिहार या मतदारसंघात 18 एप्रिलला मतदान होणार आहे. किशनगंजमध्ये अल्पसंख्याक मतदारांची संख्या मोठ्या प्रमाणात असल्याने या मतदारसंघात असदुद्दीन ओवैसी यांनी एमआयएम उमेदवार निवडून आणण्यासाठी जोर लावला आहे. एमआयएमकडून याठिकाणी माजी आमदार अख्तरुल इमान यांचा लोकसभेचं तिकीट देण्यात आलं आहे.
आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देशात निवडणुकीच्या प्रचाराला रंगत आली आहे. सत्ताधारी पक्ष असो वा विरोधी पक्ष एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करण्यात दंग आहेत. देशात लोकसभा निवडणुकीसाठी सात टप्प्यात मतदान पार पडत आहे. यातील पहिल्या टप्प्यातील मतदान प्रक्रिया पूर्ण झाली आहे. देशात 91 लोकसभा मतदारसंघासाठी मतदान पार पडले आहे. उर्वरित सहा टप्प्यातील मतदान बाकी आहे. लोकसभा निवडणुकींचा निकाल 23 मे रोजी लागणार आहे. त्यामुळे लोकसभा निवडणूक निकालानंतरच देशाची सत्ता कोणाच्या हातात जाते? भाजपा पुन्हा बहुमत मिळवणार का? यासारख्या अनेक प्रश्नांची उत्तरे जनतेला सापडतील.