पटना : कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना प्लाझ्माची मागणीही वाढते आहे. कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांच्या उपचारासाठी प्लाझ्मा उपयुक्त असल्याचे सिद्ध होत आहे. त्यामुळे स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी मोठा निर्णय घेतला आहे.
आज भारताचा 74 वा स्वातंत्र्य दिन आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी पाटण्यातील गांधी मैदानावर ध्वजारोहण केले. यावेळी नितीशकुमार यांनी कोरोनामुक्त लोकांना प्लाझ्मा दान करण्याचे आवाहन केले असून, प्लाझ्मा दान केल्यानंतर त्याबदल्यात बक्षीसही देण्याचा निर्णय घेतला आहे. प्लाझ्मा दान करणाऱ्या व्यक्तीला पाच हजार रुपयांचे बक्षीस देण्यात येणार असल्याचे नितीश कुमार यांनी सांगितले.
याचबरोबर, यावेळी आपल्या सरकारच्या कामगिरीबद्दल नितीश कुमार यांनी सांगितले. ते म्हणाले की, आपण कितीही काम केले तरी काही लोक उणीवा काढत असतात. गुन्हेगारी, भ्रष्टाचार आणि जातीयवाद याबाबत तडजोड न करण्याचा संकल्प त्यांनी पुन्हा एकदा केला आहे.
दरम्यान, कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. हे लक्षात घेऊन अनेक राज्यांमध्ये प्लाझ्मा दान करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी कर्नाटक सरकारने प्रत्येक प्लाझ्मा दात्याला त्याच्या या कामाची दखल घेत, प्रशंसनीय रक्कम म्हणून पाच हजार रुपये देण्याची घोषणा केली आहे.
देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या वाढली असून रुग्णांचा आकडा तब्बल 25 लाखांच्या वर गेला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने शनिवारी (15 ऑगस्ट) दिलेल्या माहितीनुसार, देशात गेल्या 24 तासांत कोरोनाचे 65,002 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 996 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे देशातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या 25,26,193 वर पोहोचली असून कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचा आकडा 49,036 वर पोहोचला आहे.
देशातील कोरोनाग्रस्तांपैकी 6,68,220 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर 18,08,937 रुग्ण उपचारानंतर बरे झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे.