नितीश कुमार असू शकतील विरोधी पक्षाचे पंतप्रधानपदाचे उमेदवार; संकेतही दिले...!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2022 08:08 AM2022-08-10T08:08:40+5:302022-08-10T08:08:55+5:30

राजद-जेडीयू महाआघाडी सरकारचे मुख्यमंत्री नितीश कुमार हेच असतील आणि राजदचे नेते तेजस्वी यादव उपमुख्यमंत्री असतील.

Nitish Kumar could be the opposition party's prime ministerial candidate | नितीश कुमार असू शकतील विरोधी पक्षाचे पंतप्रधानपदाचे उमेदवार; संकेतही दिले...!

नितीश कुमार असू शकतील विरोधी पक्षाचे पंतप्रधानपदाचे उमेदवार; संकेतही दिले...!

googlenewsNext

- एस. पी. सिन्हा

पाटणा :  जेडीयू पुन्हा बिहारमध्ये महाआघाडीत सामील झाला आहे. जेडीयू संसदीय मंडळाचे अध्यक्ष उपेंद्र कुशवाह यांनी नितीश कुमार यांचे अभिनंदन करताना म्हटले की, देश आपली वाट पाहत आहे. नितीश कुमार २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत विरोधी पक्षाचे पंतप्रधानपदाचे उमेदवार असू शकतात, असे संकेत कुशवाह यांनी या ट्वीटच्या माध्यमातून दिले.

राजद-जेडीयू महाआघाडी सरकारचे मुख्यमंत्री नितीश कुमार हेच असतील आणि राजदचे नेते तेजस्वी यादव उपमुख्यमंत्री असतील. आठ ते दहा महिन्यांनंतर नितीश कुमार हे मुख्यमंत्रिपदाची धुरा तेजस्वी यादव यांच्याकडे सोपवून लोकसभेच्या आगामी निवडणुकीच्या तयारीला लागतील. काही दिवसांपूर्वी नितीश कुमार हे काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्याशी फोनवरून बोलले होते. हा फोनच बिहारमधील नवीन राजकीय घडामोडींची नांदी ठरला.

२०१४ मधील लोकसभा निवडणुकीनंतर जेडीयू भाजपशी नाते तोडून महाआघाडीत सामील झाला होता. २०१५ मध्ये बिहार विधानसभेची निवडणूक जेडीयूने महाआघाडीसोबतच लढविली होती. तथापि, महाआघाडी जास्त दिवस टिकली नव्हती. २०१७ मध्ये जेडीयू पुन्हा भाजपसोबत हात मिळवित राष्ट्रीय लोकशाही आघाडीत (एनडीए) सामील झाला होता.

काँग्रेस, हम सामील होणार

बिहारमधील महाआघाडी सरकारमध्ये काँग्रेस आणि हम पक्ष सामील होणार असून डाव्या पक्षांनी बाहेरून पाठिंबा देण्याची घोषणा केली आहे. काँग्रेसकडून मदन मोहन झा, अजित शर्मा आणि शकील अहमद यांची नावे चर्चेत आहेत. 

असा आहे फॉर्म्युला

महाआघाडीच्या नवी सरकारसाठी पाच आमदारांमागे एक मंत्री असा फॉर्म्युला ठरला आहे. मुख्यमंत्रिपदाव्यतिरिक्त जेडीयूचे आठ मंत्री असतील. सर्वांत मोठी भागीदारी  राजदची असेल. राजदच्या १८ जणांना मंत्रिपद मिळू शकते. विधानसभा अध्यक्षपदासाठी जेडीयू आणि राजदची दावेदारी आहे. नितीश कुमार यांची पसंती विजय कुमार चौधरी यांना आहे.

ध्वनिफिती आल्यानंतर उडणार खळबळ...

बिहारच्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा आहे की, जेडीयूकडे अनेक ध्वनिफिती आहेत. यात भाजपचे नेते त्यांचेच मंत्री आणि वरिष्ठ नेत्यांना सरकार पाडण्याच्या मोबदल्यात मंत्रिपदाचे आमिष देत आहेत. दोन दिवसांपूर्वी जेडीयूचे राष्ट्रीय अध्यक्ष ललन सिंह यांनीही पत्रकार परिषदेत याकडे लक्ष वेधले होते. जाणकार सूत्रांनुसार महाराष्ट्राप्रमाणे भाजप बिहारमधील  सरकार पाडण्याच्या तयारीत होते; परंतु, वेळीच जेडीयूला भाजपचा हा मनसुबा कळला. त्यानंतर नितीश कुमार यांनी राजकीय डावपेच आखून डाव फिरविला.

Web Title: Nitish Kumar could be the opposition party's prime ministerial candidate

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.