Nitish Kumar Delhi Visit: 'विरोधक एकवटणार; भाजपविरोधात तिसरी आघाडी नाही तर मुख्य आघाडी तयार होणार': नितीश कुमार
By ऑनलाइन लोकमत | Published: September 7, 2022 09:09 PM2022-09-07T21:09:36+5:302022-09-07T21:09:44+5:30
Nitish Kumar Delhi Visit: बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी आपल्या दिल्ली दौऱ्यात विरोधी पक्षातील प्रमुख नेत्यांच्या भेटी घेतल्या.
Nitish Kumar Delhi Visit: बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी दिल्ली दौऱ्याच्या शेवटच्या दिवशी तिसर्या आघाडीची शक्यता फेटाळून लावली. ते म्हणाले की, 'आता देशात तिसरी आघाडी नाही, तर मुख्य आघाडी स्थापन केली जाईल'. 2024 च्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नितीश कुमार विरोधी नेत्यांच्या भेटी घेत आहेत. तीन दिवसांच्या दिल्ली दौऱ्यावर त्यांनी राहुल गांधी, शरद पवार यांच्यासह अनेक प्रमुख नेत्यांच्या भेटी घेतल्या.
मुख्य आघाडी होणार
विरोधी पक्षांच्या एकजुटीबाबत नितीश कुमार म्हणाले की, 'विविध पक्षाच्या नेत्यांकडून भेटण्यासाठी फोन यायचे, म्हणूनच दिल्लीत आलो. सर्वांकडून खूप चांगला प्रतिसाद मिळाला. 2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी विरोधक एकवटत आहेत. लोकसभेत तिसरी आघाडी नाही, तर मुख्य आघाडी स्थापन होईल.'
अटल बिहारी यांचे कौतुक
यावेळी माजी पंतप्रधान दिवंगत अटलबिहारी वाजपेयी यांचे नाव घेत नितीश कुमारांनी पुन्हा एकदा भाजपवर निशाणा साधला. ते म्हणाले, 'अटलबिहारी वाजपेयींच्या सहा वर्षात किती कामे झाली आणि चालू कार्यकाळात एकही नवीन काम झाले नाही. प्रत्येक गोष्टीला नावं ठेवणं आणि काम न करता प्रचार करणं, काम न करता फक्त प्रसिद्धी मिळवायची, ही काही लोकांची सवय आहे. सर्वांना एकत्र आणणे हे आमचे काम आहे. परस्पर सहमतीनंतर सर्व काही ठरवले जाईल.'
ते पुढे म्हणाले की, 'काँग्रेस, डावे किंवा इतर पक्ष, सर्व महत्त्वाचे आहेत. प्रत्येकजण आम्हाला प्रतिसाद देत आहे. सर्वांनी सहमती दर्शवली तर खूप चांगले वातावरण निर्माण होईल. अनेक पक्षांचे लोक एकत्र येणार आहेत, त्यावर आमचे काम सुरू आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचाही फोन आला होता, त्यादेखील आमच्यासोबत येतील,' असंही ते म्हणाले.
या नेत्यांच्या भेटी घेतल्या
दिल्ली दौऱ्यात मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी विरोधी पक्षांच्या अनेक नेत्यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी, सीपीआय-एम नेते सीताराम येचुरी, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, समाजवादी पक्षाचे अध्यक्ष मुलायमसिंह यादव, हरियाणाचे माजी मुख्यमंत्री ओम प्रकाश चौटाला, सीपीआय-एमएलचे सरचिटणीस दीपंकर भट्टाचार्य आणि जेडीएस नेते एचडी कुमारस्वामी यांची भेट घेतली.