पाटणा : लोकजनशक्ती पक्षाचे अध्यक्ष व केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांचे पुत्र चिराग पासवान हे सातत्याने करीत असलेल्या टीकेमुळे बेजार झालेले बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांना आता राज्य विधानसभेच्या निवडणुकांसाठी देवेंद्र फडणवीस यांच्यासारख्या कसलेल्या नेत्याबरोबर जागावाटपाची बोलणी करावी लागणार आहे. फडणवीस यांची बिहारचे निवडणूक प्रभारी म्हणून भाजपने नेमणूक केली आहे.कोरोनाची साथ लक्षात घेता येत्या आॅक्टोबर किंवा नोव्हेंबर महिन्यात बिहारमध्ये विधानसभा निवडणुका घेऊन नयेत, अशी मागणी लोकजनशक्ती पक्षाचे अध्यक्ष चिराग पासवान यांनी नितीशकुमारांकडे केली आहे. दुसऱ्या बाजूला आम्हाला विधानसभेच्या जास्त जागा हव्यात, अशी मागणी भाजपकडून नितीशकुमारांकडे जागावाटपाच्या चर्चेत केली जाऊ शकते. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे कसलेले नेते असून त्यामुळे जनता दल (यू)च्या नेत्यांची त्यांच्याशी चर्चा करताना कसोटी लागणार आहे.बिहारमध्ये नितीशकुमार यांनी भाजपला सहकार्य करतानाही स्वत:च्या अस्तित्वाला धक्का लागणार नाही याची नेहमीच काळजी घेतली आहे. अयोध्येत रामजन्मभूमीवर राममंदिराचे भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले. या कार्यक्रमाला अन्य मुख्यमंत्र्यंप्रमाणेच नितीशकुमार यांनाही निमंत्रण देण्यात आले नव्हते. राममंदिर भूमिपूजनाबद्दल नितीशकुमार यांनी काहीही प्रतिक्रिया व्यक्त केली नाही. एनडीएतील घटक पक्ष असलेला लोकजनशक्ती पक्ष आपलाच मित्रपक्ष जनता दल (यू)वर प्रचंड टीका करीत सुटला आहे. हे नितीशकुमार यांना फारसे आवडत नसल्याची चर्चा आहे.
बिहारमधील जागावाटपावरून नितीशकुमारांचा फडणवीसांशी सामना
By ऑनलाइन लोकमत | Published: August 18, 2020 3:08 AM