बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी आम्ही दोन वेळा आरजेडीसोबत आघाडी केली होती. मात्र आता त्यांच्यासोबत जाणार नाही असं म्हटलं आहे. एका कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांनी केलेल्या या विधानावरून बिहारमध्ये राजकारण तापलं आहे. याच दरम्यान, तेजस्वी यादव यांनी दावा केला आहे की, जेव्हा मुख्यमंत्री नितीश कुमार हे सरकार स्थापन करण्यासाठी भेटायला आले होते, तेव्हा ते विनवणी करत होते. हात जोडत होते. याचं फुटेजही आहे. यावर आता भाजपा आणि जेडीयूने जोरदार हल्लाबोल केला आहे.
जेडीयूचे राष्ट्रीय प्रवक्ते राजीव रंजन म्हणाले की, मुख्यमंत्री नितीश हे विनवणी करणारे नेते नाहीत. नितीश यांनी तेजस्वी यादव आणि त्यांचा पक्ष आरजेडीला नवसंजीवनी दिली आहे. २०१० मध्ये आरजेडीला २२ जागा मिळाल्या होत्या. सुपडा साफ झाला होता. त्या पक्षाला २०१५ मध्ये नितीश यांच्यामुळे बिहारमध्ये सर्वात मोठा पक्ष बनण्याची संधी मिळाली. तेजस्वी यादव हे आपला राग काढत आहे. वाईट-साईट बोलत आहेत. ते स्वतःचंच नुकसान करत आहे. २०२५ मध्ये २०१० ची पुनरावृत्ती होऊ शकते.
तेजस्वी यादव यांच्या विधानावर भाजपाचे प्रवक्ते कुंतल कृष्णा म्हणाले की, तेजस्वी राजकारणात इतके हताश झाले आहेत की, ते विनाकारण बोलत आहेत. तसेच ते तेजस्वी यांना म्हणाले की, तुम्ही काय बोलत आहात याचे पुरावे तुमच्याकडे असतील तर मी तुम्हाला आव्हान देतो, व्हिडीओ आणि पुरावा जाहीर करा, अन्यथा खोटं बोलणं बंद करा. नितीश कुमार यांनी तुमच्यासोबत जाणं ही त्यांची चूक होती, असं म्हणत जाहीर माफी मागितली आहे.
गेल्या मंगळवारी तेजस्वी यादव यांनी एक निवेदन देताना दावा केला होता की, गेल्या वेळी नितीश कुमार सरकार स्थापन करण्याची विनवणी करत होते. ते म्हणाले, आमच्या घरी आल्यावर त्यांनी सर्व आमदारांसमोर हात जोडून माफी मागितली. आमच्याकडे ते फुटेज आहे. ते जाऊद्या... त्यांनी सभागृहात किती वेळा हात जोडून आपली चूक मान्य केली आहे. ते पत्रकारांसमोर म्हणाले की, चूक झाली, आता आम्ही भाजपासोबत जाणार नाही.