आगामी काळात लोकसभा निवडणूक पार पडणार आहे. त्यासाठी सर्वच राजकीय पक्ष कामाला लागले आहेत. मात्र, बिहारमध्ये नाट्यमय घडामोडी अद्याप सुरूच असल्याचे दिसते. मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी राष्ट्रीय जनता दलासोबतचे सरकार पाडून पुन्हा एकदा भाजपाशी हातमिळवणी करून सरकार स्थापन केले. मात्र, हा राजकीय खेळ अजून संपलेला नाही. सत्तापालट आणि सत्तेतून बेदखल झाल्यानंतरच तेजस्वी यादव यांनी सांगितले होते की, हा खेळ अजूनही सुरू आहे. १२ फेब्रुवारीला बिहार सरकारचे भवितव्य ठरणार आहे.
१२ फेब्रुवारीला बिहार विधानसभेत नितीश कुमार यांच्या सरकारला बहुमत सिद्ध करायचे आहे. बिहारमध्ये बहुमताचा आकडा १२२ आहे आणि नितीश कुमार यांना १२८ आमदारांचा पाठिंबा आहे, जो बहुमताच्या आकड्यापेक्षा ६ ने अधिक आहे. काँग्रेसने आपल्या १६ आमदारांना हैदराबादमध्ये ठेवले आहे.
१२ तारखेला नितीश सरकारची बहुमत चाचणी नितीश कुमार यांना बहुमत सिद्ध करता येणार नाही, असा दावा बिहारमधील काँग्रेसचे आमदार करत आहेत. एकीकडे काँग्रेसला आपले आमदार फुटण्याची भीती आहे, तर दुसरीकडे काँग्रेसच खेळ करण्याची भाषा करत आहे. आरजेडी-काँग्रेस आघाडीचा जदयूच्या १२ आमदारांवर डोळा आहे. काहींना मंत्रिपदाची ऑफर दिली जात आहे तर काहींना लोकसभेचे तिकीट देण्याचे आमिष दाखवले जात आहे.
बिहार विधानसभेचे अध्यक्षपद भूषवणारे आरजेडीचे आमदार अवध बिहारी चौधरी यांनी आज स्पष्ट केले की, १२ तारखेपूर्वी आपण राजीनामा देणार नाही. मात्र, सत्ताधाऱ्यांनी बिहारी चौधरी यांच्याविरोधातच अविश्वास ठराव मांडला आहे. अवध बिहारी चौधरी यांच्या माध्यमातून आरजेडीला खेळ करायचा असल्याची टीका सत्ताधारी करत आहेत.
कोणाकडे किती आमदार? नितीश कुमार यांना १२८ (भाजपा+जदयू) आमदारांचा पाठिंबा आहे, तर दुसरीकडे तेजस्वी यादव यांच्याकडेही ११४ आमदार आहेत. म्हणजेच तेजस्वी यादव हे देखील बहुमतापासून केवळ आठ आमदार दूर आहेत. २०२२ मध्ये जेव्हा नितीश कुमार भाजपापासून वेगळे झाले आणि आरजेडीशी युती करून सरकार स्थापन केले. त्यावेळी विधानसभा अध्यक्षपदाची खुर्ची भाजपाचे विजय कुमार सिंह यांच्याकडे होती, ज्यांनी बहुमत सिद्ध करण्यापूर्वी राजीनामा दिला होता. मात्र यावेळी राष्ट्रीय जनता दलाचे अवध बिहारी चौधरी राजीनामा न देण्यावर ठाम आहेत. एकूणच १२ तारखेलाच सर्व चित्र स्पष्ट होणार आहे.