पाटणा : बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यात पंतप्रधान होण्याची गुणवत्ता असल्याचे जनता दलाच्या (संयुक्त) संसदीय मंडळाचे अध्यक्ष उपेंद्र कुशवाहा यांनी पुन्हा एकदा म्हटले. कुशवाहा यांनी लगेच खुलासा केला की, “मी कोणाला चिडवण्यासाठी नितीश कुमारांबद्दल असे बोललेलो नाही. त्यांच्यात तेवढी गुणवत्ता आहे. ही बाब जनता दलाच्या (संयुक्त) राष्ट्रीय परिषदेने स्वीकारलीही आहे.”
कुशवाहा म्हणाले की, “भविष्यात नितीश कुमार देशासाठी उत्तम पंतप्रधान होऊ शकतात. आम्ही तर वस्तुस्थिती सांगत आहोत की, नितीश कुमार यांच्यात पीएम मटेरियल आहे. जर कोणी यावरून चिडत असेल तर चिडू दे. आम्हाला काही फरक पडत नाही.” पंतप्रधान होण्यासाठी २७२ खासदारांचे समर्थन लागते, अशी टिप्पणी बिहारमधील भाजप नेत्यांनी केली होती. त्याला उत्तर देताना कुशवाह म्हणाले की, संख्याबळाचा प्रश्नच नाही.
...तरी ते दावेदार नाहीत
जनता दलाच्या राष्ट्रीय परिषदेच्या बैठकीत पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष राजीव रंजन उर्फ ललन सिंह म्हणाले होते की, नितीश कुमार पंतप्रधानपदाचे दावेदार नाहीत. परंतु, पंतप्रधान होण्यासाठी जे गुण व क्षमता हवी असते ती सगळी त्यांच्यात आहे. नितीश कुमार म्हणाले, “मला अशा गोष्टींत काही रस नाही. मी तर माझे काम करीत असतो.”