BJP trolls Nitish Kumar: भारतीय जनता पक्षाचे (भाजपा) ज्येष्ठ नेते कैलाश विजयवर्गीय यांनी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यावर सडकून टीका केली. पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी नितीश कुमार यांची तुलना एका व्यक्तीने सतत बॉयफ्रेंड (जोडीदार) बदलणाऱ्या मुलीशी केली. बिहारमध्ये गेली काही वर्षे भाजपा आणि नितीश कुमार यांचे युतीचे सरकार होते. पण काही दिवसांपूर्वी नितीश कुमार यांनी भाजपाला सोडचिठ्ठी दिली आणि तेजस्वी यादव यांच्याशी हातमिळवणी केली. त्यानंतर भाजपाकडून नितीश कुमार यांच्यावर सातत्याने टीका केली जात आहे. अशीच एक जहरी टीका आज कैलाश विजयवर्गीय यांनी केली.
"बिहारमध्ये जेव्हा नितीश कुमार यांनी भाजपाची साथ सोडली आणि ते तेजस्वी यादव यांच्यासोबत महागठबंधनमध्ये गेले, त्यावेळी मी विदेशात गेलो होतो. तेथील एक जण ही गोष्ट पाहून म्हणाला की असं तर आमच्याकडे होत असतं. आमच्याकडे मुलगी कधीही बॉयफ्रेंड बदलते. बिहारचे मुख्यमंत्र्यांचीही अशीच परिस्थिती दिसतेय. ते कधी कोणाचा हात पकडतील आणि कधी कोणाचा हात सोडतील कळत नाही", अशा शब्दांत भाजपाचे कैलाश विजयवर्गीय यांनी नितीश यांच्यावर निशाणा साधला.
नितीशकुमार यांनी भाजपसोबतची युती तोडून राष्ट्रीय जनता दल (आरजेडी) सोबत सरकार स्थापन केले. नितीश ५ वर्षांनंतर राजदसोबत आले आहेत. भाजपाने नितीश कुमार यांच्या या निर्णयाला संधीसाधू ठरवले. नितीश कुमार अशा सरकारचे नेतृत्व करत आहेत ज्यात आरजेडी व्यतिरिक्त, काँग्रेस आणि डावे बाहेरून पाठिंबा देत आहेत. नितीशकुमार हे आठव्यांदा बिहारचे मुख्यमंत्री झाले आहेत. तर लालू प्रसाद यादव यांचे पुत्र तेजस्वी यादव यांनी उपमुख्यमंत्रीपदाची धुरा हाती घेतली. या साऱ्या राजकीय खेळीमागे लालू प्रसाद यादव यांचाच विचार असून ते 'किंगमेकर' असल्याचीही चर्चा रंगली आहे.