ऑनलाइन लोकमतबिहार, दि. 16 - राज्यात सत्ताधारी आघाडीतल्या राष्ट्रीय जनता दल आणि जनता दलातील (संयुक्त) या दोन्ही पक्षांमधील वाद विकोपाला गेला आहे. जागतिक युवा कौशल्य दिनानिमित्त सरकारने पाटण्यात आयोजित केलेल्या कार्यक्रमाला बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव उपस्थित न राहिल्यामुळे आघाडी फुटीच्या उंबरठ्यावर असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. संयुक्त जनता दलाने राष्ट्रीय जनता दलाला दिलेली चार दिवसांची मुदत संपली आहे, तरीसुद्धा तेजस्वी यादव यांनी अद्यापही राजीनामा दिलेला नाही आणि त्यांनी राजीनामा देण्याची गरजच नाही, असे राजदचे प्रमुख लालूप्रसाद यादव यांनी जाहीरच केले आहे. त्याच पार्श्वभूमीवर नितीशकुमार यांनी आज रविवारी आमदारांची बैठक बोलावली आहे. या बैठकीत एखादा मोठा निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. या बैठकीत तेजस्वी यांना बरखास्त करण्याचा निर्णय झाला तर नितीश सरकार पडेल आणि नवी राजकीय समीकरणे सुरू होतील, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. राष्ट्रीय जनता दलानं सरकारचा पाठिंबा काढून घेतल्यास केवळ भाजपाचे 58 आमदार जनता दलाच्या सरकारला तारू शकतात. मात्र, भाजपाच्या जवळ गेल्यास हक्काची मतं गमावण्याची भीती जनता दलाला सतावते आहे. 2010च्या बिहार विधानसभा निवडणुकीत जनता दल युनायटेडनं 141 जागा लढवून 115 उमेदवार जिंकून आणले होते. मात्र 2013मध्ये मोदी पंतप्रधानपदाचे उमेदवार जाहीर झाल्यानंतर नितीशकुमार एनडीएमधून बाहेर पडले होते. राष्ट्रीय जनता दलानं 2010मध्ये स्वतंत्र निवडणूक लढवून केवळ 22 जागा जिंकल्या होत्या. तेजस्वींवर तुरुंगात जाण्याची वेळ आल्यास आघाडी तोडण्यासाठी लालू पुढाकार घेणार नाहीत. भाजपला दूर ठेवण्यासाठी बाहेरून पाठिंबा देतील.
सध्या दोन्ही पक्षांकडून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. आरजेडीने आपल्या 80 आमदारांचा धाक दाखवण्याऐवजी तेजस्वी यादव यांच्यावर लागलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांबाबत स्पष्टीकरण द्यावे, असा टोला जेडीयूने लगावला होता. राष्ट्रीय जनता दलाचे बिहार अध्यक्ष रामचंद्र पूर्वे यांनी आपल्या पक्षाकडे 80 आमदारांचे बळ असल्याचे वक्तव्य केले होते. आणखी वाचा